17.5 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमुख्य बातम्याकाश्मिरात कॉंग्रेस आघाडी, हरियाणात कमळ फुलले

काश्मिरात कॉंग्रेस आघाडी, हरियाणात कमळ फुलले

भाजपची हॅट्ट्रिक, आपने कॉंग्रेसचे गणित बिघडवले

चंडीगड/श्रीनगर : वृत्तसंस्था
हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. एक्झिट पोलमध्ये दोन्ही ठिकाणी भाजपला धक्का बसेल, असा अंदाज वर्तवला होता. परंतु भाजपने हा अंदाज चुकवत हरियाणात मुसंडी मारत तिस-यांदा कमळ फुलवून हॅट्ट्रिक साधली. मात्र, जम्मू-काश्मिरात कॉंग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सने बाजी मारत एकहाती सत्ता मिळविली. त्यामुळे काश्मीरमध्ये भाजपची निराशा झाली. हरियाणात कॉंग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच टक्कर झाली. परंतु जवळपास ११ ठिकाणी भाजपने काठावर विजय मिळवित एकहाती सत्ता काबिज केली. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला धक्का बसला. मतदानाच्या टक्केवारीचा विचार केल्यास अवघे ०.८१ टक्के अधिक मते घेऊन भाजपने बाजी पलटवली.

हरियाणा विधानसभेच्या एकूण ९० जागांसाठी ही निवडणूक पार पडली. शेतक-यांची नाराजी, कुस्तीपटूंचा केलेला अवमान यासह अग्नीवीरच्या मुद्यावरून कॉंग्रेसने भाजपला कोंडीत पकडले होते. त्यामुळे हरियाणात भाजपविरोधी वातावरण असल्याचे बोलले जात होते. एक्झिट पोलनेही भाजपचाच सफाया होईल, असा अंदाज वर्तवला होता. परंतु सर्वांचे अंदाज चुकवत भाजपने ९० पैकी ४८ जागांवर विजय मिळवित हरियाणात सलग तिस-यांदा एकहाती सत्ता काबीज केली. सत्तेचे स्वप्न पाहणा-या काँग्रेसला ३७ जागांवर समाधान मानावे लागले.

मतमोजणी सुरू झाली, तेव्हा सकाळच्या सत्रात काँग्रेस आघाडीवर होती. मात्र, त्यानंतर भाजपने मोठी झेप घेतली. आता हरियाणाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी विजयादशमीच्या दिवशी १२ ऑक्टोबरला होऊ शकतो.

विशेष म्हणजे २०१९ मध्ये भाजपला बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे त्यावेळी जेजेपीच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केली होती. मात्र, यावेळी भाजपला एकहाती बहुमत मिळाले. ७ महिन्यापूर्वी मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांना हटवून नायबसिंग सैनी यांच्या हाती राज्याची सूत्रे देण्याचा निर्णय भाजपच्या पत्यावर पडल्याचे बोलले जात आहे.

मतांची टक्केवारी सारखीच
हरियाणात भाजप आणि काँग्रेसच्या जागांमध्ये ११ जागांचा फरक आहे. मात्र या दोन पक्षांना झालेल्या मतदानाची टक्केवारी सारखीच आहे. भाजपला ३९.९१ टक्के तर काँग्रेसचा व्होट शेअर ३९.१० टक्के राहिला आहे. काँग्रेसपेक्षा केवळ ०.८१ टक्के अधिक मते घेऊन भाजपने ११ जागा जास्त निवडून आणल्या. त्यामुळे भाजपला सत्ता काबिज करता आली.

आपच्या भूमिकेमुळे कॉंग्रेसला फटका
राज्यात कॉंग्रेस आणि आपची आघाडी होणार होती. परंतु जागावाटपावरून बोलणी फिस्कटली. त्यामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. हरियाणात आपचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. पण त्यांनी १.७९ टक्के मते घेतली. तसेच मायावतींच्या बसपला १.८२ टक्के मतदान झाले. कॉंग्रेस, भाजपमधील ०.८१ टक्क्यांचा फरक पाहता आपने मिळविलेले मतदान भाजपच्या पथ्यावर पडले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR