24.6 C
Latur
Saturday, October 19, 2024
Homeमहाराष्ट्रसुनील केदार यांना चौकशी समितीकडून समन्स

सुनील केदार यांना चौकशी समितीकडून समन्स

नागपूर : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना चौकशी समितीकडून समन्स बजावण्यात आले आहे. चौकशी अधिकारी न्या. जे. एन. पटेल यांनी सुनील केदारसह संबंधित पक्षकारांना समन्स बजावले असून, येत्या १४, १५, १६ आणि १७ ऑक्टोबरला स्वत: किंवा वकिलामार्फत चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश यात देण्यात आले आहेत.

नागपूरच्या रवी भवन येथील सभागृहात ही चौकशी होणार आहे. समन्समध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, पक्षकारांनी चौकशीत स्वत:ची बाजू मांडावी आणि बचावाकरिता आवश्यक कागदपत्रं सादर करावीत. पक्षकार अनुपस्थित राहिल्यास चौकशीची कारवाई त्यांच्याशिवाय पूर्ण केली जाईल. तसेच ही चौकशी कोणत्याही परिस्थितीत तहकूब केली जाणार नसल्याचे या समन्समध्ये सांगितले आहे. यामुळे सुनील केदार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नेमके प्रकरण काय?
१९९९ साली सुनील केदार हे नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. त्यावेळी बँकेत असलेली रक्कम एका खाजगी कंपनीच्या सहाय्याने कोलकातामधल्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यात आली होती. मात्र सहकार विभागाच्या कायद्यानुसार बँकेची परवानगी न घेता बँकेची रक्कम दुसरीकडे गुंतवता येत नाही.

या नियमाचे उल्लंघन करत रक्कम गुंतवली गेली होती. खाजगी कंपनी दिवाळखोरीत निघाली. त्यामुळे शेतक-यांचे बँकेत ठेवलेले १५० कोटी रुपये बुडाले होते. याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवत सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. सध्या सुनील केदार त्याच प्रकरणी जामिनावर बाहेर आहेत. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार केदार यांच्याकडून घोटाळ्याची रक्कम व्याजासकट वसूल करण्यात यावी, या संदर्भातली सुनावणी सध्या सहकारमंत्र्यांसमोर सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR