मुंबई : वृत्तसंस्था
मुंबई उच्च न्यायालयाने शिर्डीच्या साईबाबा संस्थानला दिलासा दिला आहे. श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी ही सेवाभावी आणि धार्मिक संस्था असल्याने त्यांच्या बेनामी देणग्यांवर प्राप्तिकरातून सूट मिळण्यास पात्र आहे, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने आज आयकर विभागाचे अपील फेटाळून लावले.
असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा चरणी भाविक सढळ हस्ते दान देतात. या देणग्यांवर संस्थानाला आयकरातून सूट मिळण्यास पात्र असल्याचा निर्णयाला आक्षेप घेत आयकर विभागाने याचिका दाखल केली होती.
शिर्डीचे श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट धर्मादाय आणि धार्मिक दोन्ही असल्याने, त्याच्या बेनामी देणग्यांवर आयकरातून सूट मिळण्यास पात्र आहे, असा निर्णय इन्कम टॅक्स अपिलेट ट्रिब्युनलने ऑक्टोबर २०२३ रोजी दिला होता. या निर्णयाला प्राप्तिकर विभागाने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.