16.4 C
Latur
Tuesday, November 26, 2024
Homeराष्ट्रीयउद्योग क्षेत्रातील रत्न हरपले

उद्योग क्षेत्रातील रत्न हरपले

टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे निधन, उद्योग क्षेत्रावर शोककळा
मुंबई : प्रतिनिधी
देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा कंपनीचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे आज (दि.९) निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यातच आज अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रतन टाटा यांना अलिकडे सातत्याने रुग्णालयात जावे लागत होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याचे सांगितले जात होते. त्यावेळी खुद्द रतन टाटा यांनीच वाढत्या वयामुळे नियमित वैद्यकीय तपासणी होत असल्याचे सांगितले होते. दरम्यान, बुधवारी सायंकाळी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे ब्रिच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.
रतन टाटा यांनी आपल्या टाटा कंपनीच्या माध्यमातून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन लाखो कुटुंबाना आपलेसे केले होते. देशभक्ती व देशहिताचे आदर्श उदाहरण म्हणजे रतन टाटा अशी त्यांची उंची होती. ते देशातील आवडत्या उद्योगपतींपैकी एक होते. कारण देशासाठी त्यांचे खूप मोठे योगदान राहिलेले आहे. भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक समूहांपैकी एक म्हणून ओळख असणा-या टाटा समूहाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या रूपाने देशाने एक फार मोठा उद्योजक गमावला आहे. त्यामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे.

रतन टाटा यांची सुरुवातीची कारकीर्द १९६२ मध्ये टाटा समूहात सुरू झाली, जिथे त्यांनी अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी कॉर्पोरेटमध्ये काम केले होते. त्यांनी टाटा समूहाचा व्यवसाय इतर देशांमध्ये विस्तारला. उद्योग क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल रतन टाटा यांना २००० मध्ये राष्ट्रीय पातळीवरील मानाचा समजला जाणा-या पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानंतर २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रतन टाटा शेवटपर्यंत अविवाहित राहिले. उद्योग क्षेत्रातील त्यांचे योगदान खरोखर प्रेरणादायी आहे.

सढळ हाताने मदत
करणारा उद्योगपती
संवेदनशीलपणा कायम जपणारा, सढळ हाताने मदत करणारा उद्योगपती अशी रतन टाटांची ओळख होती. आयुष्यभर त्यांनी ती जपली. त्यांचा साधेपणा अनेकांसाठी कुतूहलाचा विषय राहिला. टाटा समूहाने कोणताही उद्योग सुरु करताना आधी देशाचा विचार केला. देशाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी उद्योग सुरु केले. समूहाची ही परंपरा टाटांनी कायम ठेवली. उच्च नैतिक मूल्य जपण्याचे काम त्यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR