ऐझॉल : म्यानमारमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान मंगळवारी पुन्हा एकदा म्यानमार लष्कराचे ३० सैनिकांनी शस्त्रांसह मिझोराममधील भारतीय हद्दीत घुसखोरी केली. त्यानंतर मिझोराममध्ये भारत-म्यानमार सीमेवर तैनात आसाम रायफल्सच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी आसाम रायफल्सच्या जवानांनी या सैनिकांना सीओबी तुपांग, सियाहा येथे आणले आहे. म्यानमारच्या सैनिकांनी सीमेवरील पोल क्रमांक १८ वरून भारत-म्यानमार सीमा ओलांडली.
पीडीएफ/सीएनए बंडखोरांनी शनिवारी म्यानमार आर्मी कॅम्पवर हल्ला झाल्यानंतर म्यानमारच्या लालेनपी, मातुपी येथे असलेल्या कॅम्पमधून ३० हून अधिक सैनिक पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर सोमवारी ते भारत-म्यानमार सीमेजवळ पोहोचले आणि मंगळवारी त्यांनी मिझोराममध्ये प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे.
येत्या काही दिवसांत चिन आणि राखीन राज्यात असलेल्या म्यानमारच्या लष्कराच्या छावण्यांवर हल्ले होण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय आहे की, नुकतेच म्यानमार लष्कराचे सुमारे ७५ जवान भारताच्या मिझोराम राज्यात घुसले होते. त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला होता. त्यांना नंतर म्यानमारला परत पाठवण्यात आले आहे.