28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरमहायुतीच्या फसव्या घोषणांपासून सावध रहा

महायुतीच्या फसव्या घोषणांपासून सावध रहा

लातूर : प्रतिनिधी
अडीच वर्षांपुर्वी षढयंत्र रचून सत्ता मिळविलेल्या महायुतीच्या कारभार आपण सर्वजण पाहात आहोत. नुसत्या फसव्या घोषणांचा पाऊस पाडून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. महायुतीत सुधारणा होण्याची सुतराम शक्यता नसल्यामुळे मतदारांनी डोळसपणे मतदान करुन काँग्रेस महाविकास आघाडीला प्रचंड मताधिक्यांनी विजयी करावे, असे आवाहन माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले.

बाभळगावच्या पारंपारीक दसरा मेळाव्यात प्रमुख पाहूणे म्हणून माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख बोलत होते. यावेळी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, सौ. दीपशिखा धिरज देशमुख, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय साळूंके, काँग्रेसचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, आबासाहेब पाटील, मोईज शेख, यशवंतराव पाटील, रविंद्र काळे, सर्जेराव मोरे, शाम भोसले, गपतराव बाजूळगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

काँग्रेस पक्ष श्रीरामाला आदर्श माणुन राज्य कारभार करीत आलेला आहे., असे नमुद करुन माजी मंत्री दिलीपराव देशमुख पुढे म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी रामभक्त होते. आदर्श राज्य पद्धती म्हणजे श्रीरामांचे राज्य. अज्ञाधारक पुत्र, अज्ञाधारक भाऊ कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्रीराम, श्री लक्ष्ण, आणि भरत. छत्रपती शिवाजी महाराज हे मातृभक्त होते. त्यांनी कधीही जातीभेद केला नाही. शाहू, फुले, आंबेडकर यांनी समाजवाद पुढे आणला. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांनी महापुरुषांचा आदर्श समोर ठेवुन राज्य व्यवस्था निर्माण करुन गावच्या माणसाकडे गावची सत्ता सुपुर्द केली.

आज परिस्थिती खुप बदलली आहे. भाजपा महायुतीने केवळ सत्तेसाठी घरात घर ठेवले नाही, भावात भाऊ ठेवला नाही. हजारो कोटींच्या फसव्या घोषणा केल्या जात आहेत. मतदारांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीत डोळसपणाने मतदान करुन काँग्रेस माहविकास आघाडीला प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन केले.
बाभळगावातील मंदीर, दर्गा येथे दर्शन घेतल्यानंतर दसरा मेळाव्यास सुरुवात झाली. प्रारंभी विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी लातूर शहर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा तयार करण्यामध्ये जनतेच्या सूचनांचा सहभाग घेण्याकरीता ‘क्युआर कोड’चा शुभारंभ करण्यात आला. पाहूण्यांचे स्वागत सरपंच प्रिया सचिन मस्के, उपसरपंच गोविंद देशमुख, सर्व सदस्य, विविध कार्यकारी सेवा सोयायटीचे चेअरमन महादेव जटाळ, सर्व सदस्य, पोलीस पाटील मुक्ताराम पिटले यांनी केले.

यावेळी अ‍ॅड. प्रमोद जाधव, समद पटेल, संतोष देशमुख, संभाजी सुळ, जितेंद्र स्वामी, अहेमदखा पठाण, हकीम शेख, मकबुल वलांडीकर, अविनाश बट्टेवार, प्रा. प्रविण कांबळे, अ‍ॅड. अंगद गायकवाड, कल्याण पाटील, हरिभाऊ गायकवाड, प्रविण पाटील, सुभाष घोडके, नबी नळेगावकर, सचिन दाताळ, अन्वर देशमुख, राम स्वामी, बंदेनवाज सय्यद, श्रीकृष्ण पिटले व्यंकटेश पुरी, यांच्यासह बाभळगाव पंचक्रोशीसह लातूर जिल्ह्यातील असंख्य मान्यवर उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीत महायुतीचा हिशेब घ्या
बाभळगावचा दसरा सर्वधर्मीय आहे. मिरवणुकीत सर्वजण एकदिलाने सहभागी होतात. विचारांची देवाण-घेवाण केली जाते. यात आपला व राज्याच्या विकासाची गुढी कशी उभारायची यावर चर्चा होते. सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी, त्यांच्या समृद्धीसाठी काय करावे, यावर मार्गदर्शन लाभत. लोकसभेत मतदारांनी महायुतीच्या भ्रष्टाचारी कारभाराचा हिशेब केला. तसाच हिशेब आता विधानसभेच्या निवडणुकीतही करावा, असे आवाहन आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले.

दस-याच्या निमित्ताने लोकनेते विलासराव देशमुख साहेब, दादा यांची आज आठवण होते. लहानपणी आजोबा, साहेब, काकांच्या हाताला धरून आम्ही दसरा महोत्सवात सहभागी व्हायचो. हाच विचारांचा वारसा पुढे घेऊन जात पुढच्या पिढीला देत आहोत, याचा आनंद आहे, असे नमुद करुन आमदार धिरज देशमुख म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने राज्यात चांगले काम केले. आघाडीचे सरकार जनतेचे सरकार होते . लोकांची काळजी घेणारे सरकार होते . अलीकडे सत्ता मिळवण्यासाठी पक्ष , कुटुंब फोडली जात आहेत . सत्ता असुनही सरकार लोकांचे भले करीत नाही .

महायुतीचे सरकार कंत्राटदाराचे भले करणारे सरकार आहे. कंत्राटदारांसाठी विविध कामांचे टेंडर काढायचे, योजनांच्या जाहिरातीवर भरमसाठ खर्च करायचा , असे सरकारचे धोरण आहे . लाडकी बहीण योजनेपेक्षा जाहिरातीवर अधिक खर्च केला जातो . घरगुती दैनंदिन साहित्याचे दरवाढ केल्याने त्यांना लोकसभा निवडणुकीत फटका बसला त्यामुळे गृहिणींना खूश करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. आताही दरवाढ करून लाडक्या बहिणींकडून पैसा वसूल केला जातो आहे.

भाजप सरकार नफेखोरी करते आहे पण शेतक-यांच्या मालाला भाव न देत नाही . नफेखोरी थांबून शेतक-यांचे चांगले दिवस आणायचे असतील , या सरकारला घरी बसवले पाहिजे . एका हाताने लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले जाते आणि तर दुस-या हाताने दोन हजार रुपये काढून घेतले जात आहे. काँग्रेस व आघाडी सरकारच्या काळात शेतक-यांचे चांगले दिवस होते. महायुतीचे सरकारच्या काळात महिला, शेतकरी, डॉक्टर, नर्स, अंगणवाडी सेविका, असे सर्व घटक शासनाच्या विरुद्ध आंदोलन करीत आहेत . ही सरकारच्या कामाची पावती आहे, हे सरकारचे अपयश आहे. हे सरकारच्या काळात बनवाबनवी, फसवा फसवी आणि फोडाफोडी चालू आहे. याला विराम दिला पाहिजे. यासाठी नागरिकांनी पुढे येऊन लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस व महाविकास आघाडीच्या मागे खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन यावेळी केले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR