23.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र असुरक्षीत; सुरक्षा चव्हाट्यावर

महाराष्ट्र असुरक्षीत; सुरक्षा चव्हाट्यावर

सिद्दीकी यांच्या हत्येवरून राजकारण तापले विरोधकांसह मित्रपक्षांचाही गृहमंत्री-मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

मुंबई : राष्ट्रवादीे अजित पवार गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांचे यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याची टीका विरोधकांतून होत आहे.

आम्हाला राजकरण करायचे नाही, पण महाराष्ट्र अत्यंत गंभीर वळणावर आहे. महाराष्ट्र असुरक्षित होत असून, महाराष्ट्राचा बिहार होत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. कायदा सुव्यस्था नसल्यामुळे कोणीही येते आणि गोळ्या घालते. घटना झाल्यावर आरोपी पकडणे म्हणजे न्याय मिळाला असे नाही. हे सगळ्याचे फेल्युअर असल्याचे जयंत पाटील म्हणाले. दरम्यान, राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला देखील जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. शरद पवार यांना कधी फोडाफोडीची गरज कधी भासली नाही. राज ठाकरेंचा नेमका विरोधक कोण हे त्यांनी ठरवावे. त्यांची गन सगळीकडे फिरत असते, असेही जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्रात कमकुवत यंत्रणा
या घटेनवर देखील जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. वाय प्लस सुरक्षा असूनही, पोलिस शो साठी आहेत का? असा प्रश्न पडतो. महाराष्ट्रात कमकुवत यंत्रणा झाल्याचे पाटील म्हणाले. नागपुरात पोलिस स्टेशनमध्ये पोलिस पत्ते खेळतात. सगळीकडे गुन्हेगारी वाढत आहे. महिलांना सुरक्षा देण्यात सरकार अपयशी ठरल्याचे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

सरकार गुन्हेगारांना वाचवतेय : वडेट्टीवार
राज्यातील मोठ्या नेत्यावर असा गोळीबार होतो. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश झाला आहे असे आम्ही सतत सांगतोय. मुंबई शांत होती पण अलीकडे मुंबईत या घटना वाढत आहे. मुंबईत पोलिसांचा धाक उरला नाही कारण या सरकारनेच गुन्हेगारांना पाठीशी घातले असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

मुख्यमंत्रीही जबाबदार : गुलाबराव पाटील
शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली असून या घटनेचे आम्ही समर्थन करत नाही, घटनेच्या अर्ध्या तासानंतर आरोपींना पकडण्यात आले आहे. या प्रकरणी गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्रीही जबाबदार आहेत. जबाबदारी आम्ही नाकारत नाही. आरोपींना आम्ही शिक्षा देऊ असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

फडणवीस-शिंदे जबाबदार : भुजबळ
आता ही तरुण १०, २०, ५० हजार रुपयांसाठी हत्या करतात. यापाठिमागे खंडणी प्रकरण आहे. यामागे राजकारण अजिबात नाही. याच्यामागे काही व्यवहार किंवा खंडणी असा काहीतरी प्रकार आहे. पोलिसांना यातले सर्व कळते आहे. या प्रकरणात पोलिसांना पूर्णपणे फ्री हॅन्ड दिला पाहिजे आणि ही जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांचीच नाही तर मुख्यमंत्र्­यांचीही जबाबदार आहे असे स्पष्ट मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

कायदा वा-यावर : आदित्य ठाकरे
बाबा सिद्दीकी यांची हत्या धक्कादायक आहे. आम्ही त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना आमच्या संवेदना पाठवतो. हे कृत्य महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बाबत चिंता व्यक्त करते. प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे उबाठाचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राला गुन्हेगारीची कीड : खा. गायकडवाड
खासदार वर्षा गायकवाड काय म्हणाल्या पाहा, जिथे लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्यांचे काय घेऊन बसलात.. महाराष्ट्राला लागलेली गुन्हेगारीची कीड याला जबाबदार कोण?कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघाले. आमचे जुने सहकारी, राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी जी यांच्यावर आज बेछूट गोळ्या झाडण्यात आल्या.

९ महिन्यांत ४ नेत्यांच्या हत्या
७ फेब्रुवारी २०२४ रोजी चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केला. यात उपचारादरम्यान, महेंद्र मोरे यांचा मृत्यू झाला होता. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी फेसबुक लाईव्ह करत दहिसरमध्ये शिवसेनेच्या अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा ऊर्फ ​​मॉरिस भाई याने अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली. यानंतर मॉरिसने आत्महत्या केली. यानंतर ४ ऑक्टोबर २०२४ रोजी भायखळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मा यांची हत्या करण्यात आली होती. यानंतर बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली यामुळे महाराष्ट्र हादरला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR