डेहराडून : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बोगद्यात अडकलेल्या सर्व मजुरांची अखेर सुटका झाली आहे.
मॅन्युअल ड्रिलिंगसाठी रॅट होल मायनिंगची मदत घेतल्याने कामगारांच्या बचावकार्याला वेग आला आणि रॅट होल मायनिंग मजुरांसाठी वरदान ठरली आहे. आव्हानात्मक बचाव मोहिमेत अमेरिकन ऑगर मशीन खराब झाल्यानंतर देशभरात सर्वांच्या चिंता वाढल्या होत्या. दरम्यान, बोगद्यात अडकलेल्या सर्व कामगारांची बोगद्यात बांधलेल्या तात्पुरत्या वैद्यकीय शिबिरात प्राथमिक आरोग्य तपासणी केली गेली आहे.
सिल्कियारा बोगद्याच्या प्रवेशद्वारावर ४१ रुग्णवाहिका स्टँडबायवर असून त्यातुन कामगारांना बोगद्यापासून ३० किमी अंतरावर असलेल्या चिन्यालिसौर कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये नेण्यात येत आहे. चिन्यालिसौर कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये ४१ ऑक्सिजन-सुसज्ज बेडसह एक वॉर्ड देखील तयार करण्यात आला आहे, जो प्रत्येक कर्मचा-याला त्वरित वैद्यकीय सेवा देण्यासाठी सज्ज आहे.
गेल्या १७ दिवसांपासून हे कामगार सिल्कियारा बोगद्या अडकले होते. त्यांनी गेल्या १७ दिवसांपासून सूर्यप्रकाश पहिला नव्हता. त्यांच्या परिजनांकडून चिंता व्यक्त केली जात होती. सगळेजण त्यांच्या सुटकेसाठी प्रार्थना करत होते. आता या कामगारांसोबत त्यांच्या नातेवाईकांनाही रुग्णवाहिकेत प्रवेश देण्यात आला आहे.
अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी सोमवारपासून रॅट होल मायनिंग खाणकाम करणाऱ्यांची मदत घेण्यात आली. या कामगारांनी ८०० मिमी पाईपमध्ये घुसले आणि ड्रिलिंग केले. ते एक एक करून पाईपच्या आत जायचे आणि नंतर हाताच्या सहाय्याने छोट्या फावड्याने खोदायचे. एका वेळी ट्रॉलीतून सुमारे अडीच क्विंटल ढिगारा बाहेर पडायचा.
रॅट-होल मायनिंग म्हणजे ४ फुटांपेक्षा कमी रुंद खड्डा खणण्याची प्रक्रिया आहे. कोळसा खाणकामात याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. झारखंड, छत्तीसगड आणि ईशान्येमध्ये रॅट होल मायनिंग सर्रासपणे सुरू आहे. पण रॅट होल मायनिंग हे अत्यंत धोकादायक काम असल्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली आहे.
अनेक एजन्सींचा सुव्यवस्थित प्रयत्न
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कामगारांची सुटका झाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहले की, सिल्कियारा बोगद्याच्या कोसळलेल्या दुर्घटनेत अडकलेल्या ४१ मजुरांची यशस्वीरित्या सुटका झाल्याने मी पूर्णपणे आनंदी आहे. हा अनेक एजन्सींनी केलेला एक सुव्यवस्थित प्रयत्न होता, जो अलिकडच्या वर्षांत सर्वात लक्षणीय बचाव कार्यांपैकी एक होता.