नवी दिल्ली : शनिवारी रात्री माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. तिघांनी सिद्दिकी यांच्याच ऑफिसमोर हल्ला केला. आता या घटनेनंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, कारण या हत्येची जबाबदारी त्याच्या गँगने घेतल्याची एक फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे. या हत्येनंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईबाबत मोठे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या चौकशीदरम्यान लॉरेन्सने त्याच्या ५ टार्गेट्सचा खुलासा केला होता.
एनआयएने लॉरेन्स बिश्नोई टोळीची तुलना दाऊद इब्राहिमच्या ‘डी कंपनी’शी केली आहे. केंद्रीय एजन्सीचे म्हणणे आहे की लॉरेन्स बिश्नोई आणि त्याची गँग अनेक ठिकाणी पसरली आहे. लॉरेन्स हा गुजरातच्या साबरमती तुरुंगात बंद असला तरी त्याच्या सांगण्यावरून हे गुन्हे सातत्याने घडत आहेत. एनआयएला त्याच्याविरोधात आता आणखी पुरावे सापडत आहेत. एनआयएच्या चौकशीदरम्यान लॉरेन्सने त्याचे ५ टार्गेट सांगितल्याचे बोलले जात आहे. यात त्याच्या पहिल्या नंबरवर अभिनेता सलमान खान असल्याचे त्याने सांगितले.
सलमान खान-काळवीट शिकार
लॉरेन्स बिश्नोईने एनआयएसमोर कबुली दिली होती की, त्याला सलमान खानला मारायचे होते. त्यामागील कारणही त्याने सांगितली आहेत. लॉरेन्स म्हणाला की, काळवीट शिकार प्रकरणावरून तो सलमानवर नाराज आहे. सलमानवर हल्ला करण्यासाठी दोन वेळा रेकी केली.
सगुनप्रीत सिंग-विक्कीची हत्या
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची हत्या त्याने आधीच केली आहे. आता त्याचे पुढचे टार्गेट सगुनप्रीत सिंग आहे. सिंग हा मूसेवाला यांचा मॅनेंजर होता. त्याने लॉरेन्स बिश्नोईच्या जवळच्या विक्की मिड्डूखेडाच्या हत्येतील शुटरांना आश्रय दिला होता. मोहालीत मिड्डूखेडाची हत्या झाली. लॉरेन्स गँग विद्यार्थी राजकारणाच्या काळापासून विकी मिड्दुखेडा यांना आपला भाऊ मानत होती. २०२१ मध्ये त्याची हत्या झाली होती.
मनदीप धालीवाल-हत्याकांडात मदत
लॉरेन्सच्या हिटलिस्टमध्ये गँगस्टर मनदीप धालीवाललाही आहे. धालीवाल हे बंबिहा टोळीचा म्होरक्या लकी पटियालच्या जवळचे मानले जातात. लॉरेन्स बिश्नोईने एनआयएला सांगितले होते की, त्याला मनदीपचा खून करायचा होता कारण त्याने विकी मिड्दुखेडाच्या मारेक-यांना आश्रय देण्यातही मदत केली होती.
कौशल चौधरी-बिश्नोईचा कट्टर शत्रु
कौशल चौधरीही निश्नोईच्या टार्गेटवर आहे, चौधरी सध्या गुरुग्राम तुरुंगात आहे. तो लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीचा कट्टर शत्रू आहे. लॉरेन्सच्या कबुलीनुसार, कौशल चौधरीने विकी मिड्दुखेडा, भोलू शूटर, अनिल लठ आणि सनी लेफ्टी यांच्या मारेक-यांनाही शस्त्रे पुरवली होती.
अमित डागर-बंबीहा टोळीचा प्रमुख
अमित डागर हा बंबीहा टोळीचा प्रमुख आहे. ही लॉरेन्स बिश्नोईची प्रतिस्पर्धी टोळी आहे. त्यानेच विकीच्या हत्येचा कट रचला होता, असे एनआयएला त्याने सांगितले.