नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला. यावेळी निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना एक्झिट पोलसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. नुकत्याच झालेल्या हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीचे एक्झिट पोल आले होते. ते एक्झिट पोल फोल ठरल्याचा प्रश्न निवडणूक आयुक्तांना विचारला. त्यावेळी एक्झिट पोलबाबत चिंता निर्माण करणारी परिस्थिती असल्याचे आयुक्त म्हणाले.
एक्झिट पोलने अपेक्षा वाढल्याने एक मोठं डिस्टॉर्शन निर्माण होत आहे. हा आत्मचिंतन आणि आत्ममंथनाचा विषय माध्यमांसाठी आहे. गेल्या काही निवडणुकांपासून दोन-तीन गोष्टी एकत्र होत आहेत. आधी एक एक्झिट पोल येतो. आम्ही त्याला गृहित धरत नाही. पण त्याबाबतची समीक्षा केली पाहिजे. त्याचा सँपल सर्व्हे कुठे झाला, कुठे सर्व्हे झाला हे सर्व पाहण्याची आवश्यकता आहे.
पोलिंग संपल्यावर तिस-या दिवशी निकाल येतो. पोलिंग संपल्यावर एक अपेक्षा वाढवली जाते, असं होणार म्हणून सांगितलं जातं. पण जेव्हा निकाल लागतो, तेव्हा ८ वाजून ५ मिनिटांनी निकाल दाखवले जातात. किती लीड आहे सांगितलं जातं हा मूर्खपणा आहे. एक्झिट पोलला जस्टिफाय करण्यासाठी हे ट्रेंड दाखवले तर जात नाहीत? नंतर पहिला राऊंडचा निकाल २० मिनिटांत येत नाही. आम्ही ९.३० वाजता पहिला राऊंड टाकतो. नंतर ११.३० वाजता टाकतो. आम्ही १ वाजून ३० मिनिटांनी टाकतो. ऑफिशियल साईटला निकाल यायला अर्धा तास लागतो. पण लोकांच्या अपेक्षा अधिक वाढवल्या जातात. पण जेव्हा खरा निकाल येतो तेव्हा मिसमॅच होतं. हा विषय असा आहे, आमचे हात बांधलेले आहेत. पण त्यावर मंथन करण्याची गरज आहे. सर्वांनी सेल्फ करेक्शन केलं पाहिजे.
‘ईव्हिएम’वर घेतल्या जाणा-या शंकासंदर्भात आयुक्त म्हणाले, मी अनेकदा त्यावर सांगितलं. आता ‘ईव्हिएम’ची तुलना पेजरने केली जात आहे. पेजरमध्ये स्फोट होऊ शकतो, मग ‘ईव्हीएम’ने का होऊ शकत नाही असं विचारलं जातं. पेजर कनेक्टेड असतं. पण ईव्हीएम कनेक्टेड असत नाही. पाच सहा महिन्यांपूर्वी ईव्हीएमची एफएलसी होते. आमच्याकडे कुणी विचारणा केली तर आम्ही लिखित उत्तर देऊ आणि ते पब्लिशही करू. आम्ही ईव्हीएमची सर्व चेकिंग करत असतो. स्टोरेजपासून बुथपर्यंत प्रत्येकवेळी राजकीय पक्षाचे एजंट असतात. मशीनमध्ये कमिशनिंग करताना त्यात बॅटरी टाकली जाते. ईव्हीएमवर संशय घेतलेच जाणार आहेत, असेही निवडणूक आयुक्त राजीवकुमार म्हणाले.