सेलू/प्रतिनिधी
राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांच्या श्रीराम कथेच्या निमित्ताने मंगळवार, दि.१५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. क्रांतीचौक, नूतन विद्यालय, स्टेशनरोड सारंगीगल्ली हनुमान मंदिर, बिहाणी यांचे घर या मार्गाने श्री बालाजी मंदिरमध्ये शोभायात्रेची सांगता झाली.
या शोभायात्रेत श्रीरामायण ग्रंथ दिंडी, बँड पथक, धर्म ध्वज, अश्व, मारोती ध्वजधारी युवक, लेझीम पथक मुले-मुली, श्रीराम उत्सव मूर्ती, कलशधारी, तुळसधारी माता भगिनी, महिला व वारकरी भजनी मंडळ, वेद विद्यालयाचे विद्यार्थी, स्वामीजींचा रथ, माता-भगिनी, बंधू उत्साहाने सहभागी झाले होते. पुरूष भगव्या टोप्या व रूमाल, महिला तसेच भगवे ध्वज यामुळे वातावरण फुलून गेले होते. शोभायात्रेदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा स्वामीजी यांच्या रथावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. शोभायात्रेतील उपस्थित मान्यवरांनी पालखी खांद्यावर घेऊन सहभाग नोंदविला.
स्थिर देखावे-अनोखा उपक्रम
शोभायात्रेदरम्यान मार्गावरील स्थिर देखावे शहरातील नागरिकांचे आकर्षण ठरले. हा उपक्रम सेलू शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहावयास मिळाल्यामुळे अनोखा उपक्रम ठरला. लोकमान्य टिळक पुतळा परिसरात स्वामी विवेकानंद विद्यालयातील चिमकुल्यांनी महाराष्ट्रातील संत परंपरा साकारली. मोंढा कॉर्नरवर नूतन कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी श्रीराम जन्माचा देखावा सादर केला होता. स्वामीजींनी पाळणा हलवून विद्यार्थ्यांना दाद दिल्यामुळे उपस्थित भावूक झाले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गुरूकुल परंपरेच्या सजीव देखाव्याने लक्ष वेधले.
मोंढा रस्त्यावर नूतन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केवट द्वारा श्रीराम चरण पूजा हा देखावा सादर केला. स्टेशनरोडवरील सौ.सावित्रीबाई बद्रीनाराणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या श्री प्रभू रामचंद्र व हनुमंत भेट या देखाव्यातील हनुमंतरूपी विद्यार्थ्याचे स्वामीजींचे विशेष स्वागत केले. या वेळी हनुमानाच्या वेषातील विद्यार्थ्याच्या मनात स्वामीजींचे स्वागत करण्याची इच्छा होती. मात्र स्वामीजींनीच विद्यार्थ्याच्या गळ्यात पुष्पमाळ घातल्यानंतर विद्यार्थी क्षणभर भावूक झाले. श्री संत गोविंद बाबा चौकात यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेली स्वराज्य शपथ हा देखावा लक्षवेधी ठरला. स्टेशन रोडवरील श्रीराम प्रतिष्ठानच्या प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्रीरामराज्याभिषेक सोहळा व भारतमाता आणि महापुरूष देखावे उपस्थितांचे आकर्षण ठरले.
शोभायात्रेतील विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सजीव देखाव्यांची स्वामाजींनी काही क्षण रथ थांबवून पाहणी केली व देखाव्यातील विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले. देखावे व ज्ञानोबा, तुकाराम यांच्यासह श्रीरामाच्या जयघोषामुळे सेलू शहरात आयोध्यानगरी अवतरल्याचा अनुभव उपस्थितांना मिळाला. शोभायात्रेच्या प्रारंभी स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज व श्रीरामकथेचे आयोजक बिहाणी कुटुंबियांनी श्रीरामायण ग्रंथाचे पूजन केले. दुपारी दोन वाजता नूतन विद्यालय परिसरातील हनुमानगढ येथे श्रीराम कथेला प्रारंभ झाला. या वेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.