मुंबई : प्रतिनिधी
मुंबईमध्ये पावसाची उपस्थिती कायम असताना मुंबईसह महाराष्ट्र आणि देशातूनही नैऋत्य मोसमी वारे परत फिरल्याचे भारतीय हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केले. परंतु महाराष्ट्रात पूर्वेकडून येणा-या वा-यांमुळे पावसाळी वातावरण कायम आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील भागांत यलो अलर्ट कायम असणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात पूर्वेकडून येणा-या वा-यांमुळे पावसाळी वातावरण कायम आहे. सर्वसाधारणपणे ईशान्येकडून येणा-या वा-यांमुळे तामिळनाडू, केरळ यांना पाऊस मिळतो. पण, सध्या नैऋत्य मोसमी वा-यांची माघार आणि ईशान्य मोसमी वा-यांचा देशातील प्रवेश अशी बदलाची प्रक्रिया सुरू आहे.
त्यातून मेघगर्जनांचा अनुभव येत असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी सांगितले. कोरडे वारे आणि आर्द्रतायुक्त वारे यामुळे महाराष्ट्रात येत्या आठवडाभर पावसाची शक्यता कायम आहे. ही बदलाची प्रक्रिया पूर्ण होऊन ईशान्य मोसमी वारे स्थिरावले की मेघगर्जना आणि पाऊस कमी होईल, असे त्यांनी सांगितले.
दक्षिण कोकण विभाग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली येथे आठवडा अखेरपर्यंत यलो अलर्ट आहे. तर, नाशिक, अहिल्यानगर येथे आज, बुधवारसाठी त्यानंतर अहिल्यानगर येथे शुक्रवारी आणि शनिवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मान्सूनने माघार घेतल्यानंतर लगेचच संपूर्ण कोरडे वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाही, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
मुंबईत यलो अलर्ट
मुंबईमध्ये आज, बुधवारसाठी यलो अलर्ट कायम असून, दिवसभर उकाडा आणि त्यानंतर संध्याकाळच्या काही काळामध्ये मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यालाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे मान्सूनच्या परतीच्या प्रवासातील मेघगर्जनेसह पडणारा पाऊस सध्या मुंबई आणि राज्यात ठिकठिकाणी अनुभवायला येत आहे.