नवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर पाच ऑगस्ट रोजी बांगला देशमधील शेख हसिना यांची सत्ता उलथवून टाकण्यात आली होती. त्यानंतर शेख हसिना या भारतात आश्रयाला आल्या होत्या. त्यानंतर शेख हसिना या गाझियाबादमध्ये खरेदी करताना दिसल्या होत्या. मात्र तेव्हापासून शेख हसिना यांच्या ठावठिकाण्याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाही. यादरम्यान, शेख हसिना यांच्यामुळे भारतबांगलादेशसोबत कुठलाही विवाद ओढवून घेऊ इच्छित नसल्याने शेख हसिना ह्या दिल्ली सोडून गेल्या असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
मात्र भारतीय परष्ट्र मंत्रालयाने आता याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, बांगला देशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना या सुरक्षेच्या कारणामुळे दिल्लीमध्ये आल्या होत्या. अद्यापही त्या दिल्लीमध्येच आहेत. दरम्यान, बांगला देशने शेख हसिना यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावले आहे. तसेच १८ नोव्हेंबरपूर्वी कुठल्याही परिस्थितीत त्यांना हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बांगला देश सरकारनेही शेख हसिना यांना पुन्हा बांगला देशमध्ये पाठवावे असे आवाहन भारताला केले आहे.
शेख हसिना या ढाका येथून निघून भारताकडे निघाल्या. तेव्हा त्या बांगलादेशमधून पूर्वोत्तर भारतात आणि तिथून गाझियाबाद येथील हिंडेन विमानतळावर पोहोचल्या होत्या. त्यानंतर शेख हसिना आणि त्यांची बहीण तेथील एका दुकानात काही खरेदी करताना दिसल्या होत्या. त्यानंतर हसिना यांना दिल्लीमधील सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. यादरम्यान, शेख हसिना या दिल्ली सोडून अन्यत्र निघून गेल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या स्पष्टीकरणामुळे शेख हसिना या भारतात असल्याचंच समोर आले आहे.