अंतरवाली (सराटी) : विधानसभा निवडणुकीत आरक्षणाचा विषय गेम चेंजर ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. ओबीसी, धनगर आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच भाजप नेत्यांच्या अंतरवाली सराटीत ये-जा आणि ऊठ-बस वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर होताच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी राजकीय नेते आणि इच्छुकांची रांग लागली आहे. सरकारमधील मंत्री मध्यरात्री भेटी घेत असल्याने या भेटीमागील गूढ काय, याची उत्सुकता सा-यांनाच लागून आहे. लोकसभा निवडणुकीत ‘जरांगे फॅक्टर’ महत्त्वाचा ठरला. मराठवाड्यात सात जागांवर महायुतीचा पराभव झाला. त्याची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये म्हणून महायुतीच्या नेत्यांचे पाय अंतरवाली सराटीकडे मध्यरात्री वळत आहेत.
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरावली सराटीत भेट घेतली. यानंतर आता सुरेश धस यांनी अंतरावली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. मध्यरात्री १ वाजता ही भेट झाल्याची माहिती मिळाली. भाजप नेते आणि माजी आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. जवळपास अर्धा तास या दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीत काय चर्चा झाली हे मात्र अद्याप समोर आले नाही. परंतु, एकामागून एक भाजप नेते अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आचारसंहिता लागल्यानंतर अंतरवाली सराटी येथे मध्यरात्री येऊन अनेक राजकीय नेते मंडळींनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. यात मंत्री उदय सामंत, एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री राजेश टोपे यांचा समावेश आहे.