पुणे : माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अखेर घरवापसी केली आहे. त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. १९९२-९३ पासून आदरणीय पवार साहेबांबरोबर काम करत आहे. १९९५ मध्ये देखील अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सातत्याने अनेक वर्ष साहेबांबरोबर काम केल्याचे शिंगणे म्हणाले. राजकारण-समाजकारणात केवळ पवारसाहेबांमुळे मोठे होण्याची संधी प्राप्त झाल्याचे शिंगणे म्हणाले.
मधल्या काळात मी वर्षभर अजित दादांबरोबर होतो. पण वेळोवेळी मी सांगितलेला आहे की, जिल्हा बँकेच्या अनेक अडचणींमुळं मी अजित पवारांबरोबर होतो. सरकारकडून मदत मला मिळाली नसती तर बँक वाचवणे मला अवघड झाले असते असेही शिंगणे म्हणाले. म्हणून मी अजित दादांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. पण आज महाराष्ट्राला ख-या अर्थाने वाचवण्याची गरज आहे असे शिंगणे म्हणाले. राजकीय सामाजिक दृष्ट्या आणि अनेक इतर विषयांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला वाचवण्याची गरज आहे. आदरणीय पवार साहेबच हे काम करू शकतात यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे असेही शिंगणे म्हणाले.
जे नेतृत्व काम देईल ते मी करेन : शिंगणे
आज मी पक्षात वापस येतोय पक्षात प्रवेश करत नाही असे शिंगणे म्हणाले. पक्ष आणि नेतृत्व जे काही सिंदखेड राजा मतदारसंघात जी जबाबदारी देण्यात येईल ती मी स्वीकारेल. मला कोणत्याही प्रकारचा आश्वासन दिले नव्हते मी स्वत:हून त्या पक्षातून बाहेर पडलो होतो. पक्ष संघटना वाढविण्यासाठी जे नेतृत्व काम देईल ते मी करेन असेही शिंगणे म्हणाले. गायत्री शिंगणे यांच्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, लोकशाहीत सर्वांना काम करण्याच्या आणि नेतृत्व करण्याचा अधिकार आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा.