परभणी : पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयातून शनिवार, दि. १९ रोजी दुपारी ४ वाजेपासून पूर्णा नदीच्या पात्रात पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. येलदरी जलाशयावरील खडकपूर्णा प्रकल्पातून पूर्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
त्यामुळे येलदरी जलाशयात पाण्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिका-यांनी शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास येलदरी जलाशयाचे सहा गेट ०.५ मीटरने उचलण्याचा निर्णय घेतला. सद्यस्थितीत वीज निर्मिती केंद्रातून ३ टर्बाइनने २६०० व स्पाईलवे गेट क्रमांक १,५,६ आणि १० द्वारे ८ हजार ४४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पूर्णा नदी पात्राच्या काठावरील ग्रामस्थांनी सतर्क रहावे असे आवाहन पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिका-यांनी केले आहे. प्रकल्प भरल्याने नागरिकांत समाधान आहे.