मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडीत कोणतेच मतभेद नाहीत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही विधानसभेच्या निवडणुका एकत्रच लढवणार आहोत. आघाडीतील जागावाटप २ दिवसांत पूर्ण होऊन त्याची आम्ही घोषणा करू, अशी ग्वाही काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज दिली. आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आहेत. आम्ही सर्व एकजुटीने भाजपाविरोधात लढू व भ्रष्ट महायुती सरकारला हद्दपार करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विधानसभेच्या विदर्भातील जागांवरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात बेबनाव निर्माण झाला होता. विदर्भातील काही जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गट या दोन्ही पक्षांनी हक्क सांगितला आहे. चर्चेच्या अनेक फे-या होऊनही तोडगा निघत नव्हता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपला आग्रह सोडण्यास तयार नसल्याने ठाकरे गट नाराज आहे. आघाडीतील हा राजकीय बेबनाव दूर करण्यासाठी रमेश चेन्नीथला यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी नाना पटोले उपस्थित नव्हते. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, आमदार भाई जगताप, शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित होते.
त्यानंतर चेन्नीथला यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मातोश्रीवर आलो होतो. त्यांची आणि महाविकास आघाडीची तब्येत चांगली आहे. आमच्यात कोणतेही वाद नाही. मी नाना पटोले आणि संजय राऊत या दोघांशीही बोललो आहे. या वादात काहीच तथ्य नाही, आम्ही एकत्र आहोत. महाविकास आघाडीच्या बैठका सुरूच राहणार आहेत, असे सांगत चेन्नीथला यांनी वादावर पडदा टाकला.
आघाडी असल्यामुळे जागावाटपांवर चर्चा होत असते; पण ते २ दिवसांत पूर्ण होईल, असे सांगतानाच आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे महाविकास आघाडीला सक्षम बनविण्यासाठी काम करीत आहेत. त्यांचे मत विचारात घेऊनच आम्ही पुढे जाऊ आणि आम्ही मिळून एकत्र काम करणार आहोत, असेही चेन्नीथला यांनी स्पष्ट केले. दरम्यान माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, लवकरात लवकर उमेदवार यादी जाहीर व्हावी, अशी अपेक्षा आहे. आज रात्री उशिरापर्यंत जागावाटपाची चर्चा पूर्ण करू. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांत मतभेद नाहीत. आघाडीच्या राजकारणात एखाद्या जागेवरून चर्चा वाढत असते. कालही दिवसभर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जयंत पाटील आणि आम्ही चर्चेला बसलो होतो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्यातील बरेचसे पेच सुटले आहेत. शेवटी एकत्र बसून गुंता सोडवण्याची मानसिकता लागते, असे ते म्हणाले.
निवडणुकीनंतरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? असा प्रश्न प्रत्रकारांनी केला असता चेन्नीथला म्हणाले, महाविकास आघाडीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे त्यामुळे निवडणुकीनंतरच आम्ही पुन्हा एकत्र बसून कोण मुख्यमंत्री बनणार याचा निर्णय घेऊ. सध्या महाविकास आघाडीला बहुमत मिळावे हेच आमचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सर्व पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मैदानात उतरले असून भ्रष्ट सरकारला हटविण्यासाठी आम्ही एकत्र काम करणार असल्याचेही चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.
महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे हे त्यांनी जाहीर करावे, असे आम्ही सातत्याने विचारत होतो; पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यास ते घाबरले आहेत. भ्रष्ट महायुती सरकारने महाराष्ट्र विकायला काढला असून सरकार जमिनी विकत आहेत. सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे आणि योजनादूतच्या नावाखाली जनतेच्या पैशांवर हे सरकार भाजपचा प्रचार करीत आहे. काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर योजनादूतसह सरकारने घेतलेले अनेक निर्णयही रद्द केले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
पांचजन्य या आरएसएसच्या मुखपत्राने बाबा सिद्दिकींचा कुख्यात माफिया दाऊदशी संबंध जोडलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना, दाऊद असो किंवा देशभरातील कोणताही गुन्हेगाराने भाजपमध्ये प्रवेश केला तर ते स्वच्छ होतात आणि संघही त्यांचे स्वागत करतो. ज्यांच्या विरोधात गाडीभर पुरावे होते ते भाजपमध्ये आले. ज्यांना चक्की पिसिंग करणार होते त्यांना भाजपमध्ये घेतले त्यावर संघ काहीच बोलला नाही.
भाजप सरकारबरोबर बाबा सिद्दिकी आले, एकनाथ शिंदे आले आणि ते मुख्यमंत्री झाले त्या वेळी संघ का बोलला नाही? आता बाबा सिद्दिकींची हत्या झाल्यानंतर त्यांचा दाऊदशी संबंध दाखवण्याचा प्रयत्न ते का करीत आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नबाव मलिक यांच्या वरही भाजपने दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याच नवाब मलिक यांचे मतदान भाजपला चालते. भाजपचे आणि संघाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
काँग्रेसच्या वरिष्ठ निरीक्षकांची बैठक
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने नियुक्त केलेल्या वरिष्ठ निरीक्षकांची बैठक आज टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला प्रभारी रमेश चेन्नीथला, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहेलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, कर्नाटकचे मंत्री जी. परमेश्वरा, एम. बी. पाटील, तेलंगणाचे मंत्री उत्तम कुमार रेड्डी, दरासरी अनुसया सीताक्का, टी. एच. सिंग देव, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते.