मुंबई : विशेष प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक आहेत. अजूनही महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपांचा निर्णय झाला नाही. त्यामुळे इच्छुकांची धाकधुक वाढली आहे. अनेक मतदार संघात इच्छुकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे महाविकास आघाडी बरोबरच महायुतीच्या नेत्यांचीही डोकेदुखी वाढली आहे. अशा वेळी बंडखोरांना रोखायचं कसं असा प्रश्न होता. त्यासाठी आता महायुती आणि आघाडीने नामी शक्कल लढवली आहे. त्यातून बंडखोरी ही होणार नाही आणि बंडखोरांना कात्रजचा घाटही दाखवता येईल. पण त्यात आता किती यश मिळणार हे मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी समजेल.
इच्छुकांची मोठी संख्या पाहात बंडखोरी कशी टाळायची यासाठी आघाडी आणि महायुतीने रणनिती आखली आहे. त्यानुसार शेवटच्या क्षणी उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. शिवाय ज्या जागांवर वाद आहेत अशा जागांवर उमेदवारांना परस्पर एबी फॉर्म दिले जातील. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळाली आहे हे समजणार नाही. शेवटच्या क्षणी बंडखोरी करणा-यांना धावपळ करावी लागेल.
शिवसेना ठाकरे गटाने आपली यादी सामनातून जाहीर होईल असे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेतील इच्छुक हे सामनाकडे लक्ष लावून असतील. काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटानेही ज्या जागांवर वाद नाही, जे उमेदवार सक्षम आहेत अशा जागांवरील उमेदवारी सर्वात पहिले जाहीर केली जाणार आहे. पण ज्या ठिकाणी इच्छुकांची संख्या अधिक आहे अशा जागांवर एबी फॉर्म अधिकृत उमेदवाराला शेवटच्या क्षणी दिला जाणार आहे. जिल्हाध्यक्षांच्या मार्फत तो उमेदवाराला दिला जाईल. बंडखोरी कमी व्हावी यासाठी सर्वच पक्षांनी हा निर्णय घेतला आहे. अशा स्थिती बंडखोरांना बेसावध ठेवण्याची रणनिती या मागे आहे.