बंगळुरू : वृत्तसंस्था
न्यूझिलंड क्रिकेट टीमने टॉम लॅथमच्या नेतृत्वात इतिहास रचला आहे. न्यूझिलंडने भारत दौ-यातील कसोटी मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. न्यूझिलंडने बंगळुरूतील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियावर ८ विकेट्सनी विजय मिळवला आहे.
टीम इंडियाने न्यूझिलंडला विजयासाठी १०७ धावांचे आव्हान दिले होते. न्यूझिलंडने हे आव्हान २७.४ ओव्हरमध्ये २ विकेट्स गमावून पूर्ण केले. न्यूझिलंडने या विजयासह ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली तसेच ३६ वर्षांची प्रतीक्षा संपवली. न्यूझिलंडचा हा भारतातील तिसरा आणि १९८८ नंतरचा पहिला विजय ठरला.
रचीन रवींद्र हा न्यूझिलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. रचीनने पहिल्या आणि दुस-या डावात निर्णायक खेळी करत न्यूझिलंडच्या विजयाचा पाया रचला. रचीनने दुस-या डावात नाबाद ३९ धावा केल्या. तर पहिल्या डावात टीम साऊथीसोबत आठव्या विकेटसाठी १३७ धावांची गेमचेंजिंग पार्टनरशीप केली. या भागीदारीमुळे ख-या अर्थाने सामना न्यूझिलंडच्या बाजूने झुकला. रचीनने पहिल्या डावात शतकी खेळी केली. रचीनचे हे भारतातील पहिले तर कसोटी कारकीर्दीतील दुसरे शतक ठरले. रचीनने पहिल्या डावात १५७ बॉलमध्ये १३४ धावा केल्या.