पुणे : प्रतिनिधी
राज्यामध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे जोरदार राजकारण रंगत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षाकडून प्रचार केला जात आहे. यामध्ये आता उद्ध ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. संभाजी ब्रिगेड व शिवसेना ठाकरे गटाची युती तुटणार आहे. मागील अडीच वर्षे असणारी ही युती तुटणार असून यामुळे शिवसेना ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.
विधानसभा निवडणुकीमुळे जागावाटप व फॉर्म्युला यावर चर्चा सुरु आहेत. महाविकास आघाडीमध्ये विचारले जात नसल्यामुळे अनेक लहान घटक पक्ष नाराज आहेत. आता संभाजी ब्रिगेड देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. संभाजी ब्रिगेडच्या जागांवरती उमेदवार दिला जात नसल्याने ते नाराज आहेत. शिवसेना ठाकरे गटासोबत युती सोडून राज्यभरामध्ये ५० हून अधिक उमेदवार जाहीर करणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेड नाराज असून त्यांनी आता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा आहेत. पण यामध्ये आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत देखील साथ देतील अशी चर्चा आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीमध्ये उतरण्याचे ठरवले आहे. मराठा बांधवांशी संवाद साधून त्यांनी मैदानामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत प्रमुख पक्षांसह अनेक घटक पक्षांचे देखील प्रयत्न चालू आहेत. काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडच्या एका शिष्टमंडळाने मराठा नेते जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेड मनोज जरांगें यांच्याबरोबर जाणार आहेत. त्यामुळे आता राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत संभाजी ब्रिगेड यांची युती दिसणार का? अशी चर्चा सुरु आहे. लवकरच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.