छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची यंदाच्या निवडणुकीत वेगळीच खेळी सुरू आहे. जलील यांनी जिल्ह्यातील एका आणि शहरातील दोन विधानसभा ठिकाण अशा तीन ठिकाणचा अर्ज घेतला आहे. शिवाय त्यांनी नांदेड लोकसभेची पोट निवडणूक लढण्याचे देखील जाहीर केले आहे. यामुळे माजी खासदार जलील यांच्या मनात नेमके चालले काय आहे? याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर इम्तियाज जलील विधानसभा लढणार हे नक्की होते. पण त्यांनी वेगळाच डाव टाकत नांदेड लोकसभा पोट पोटनिवडणूक लढवण्याची घोषणा केली. यासोबत विधानसभा देखील लढणार असेही म्हटले. यामुळे यंदा दोन ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात जलील असतील या निर्णयाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. मात्र, आता जलील यांची वेगळीच खेळी समोर येत असून त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातून दोन आणि जिल्ह्यातील एका विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज घेतला आहे. यामुळे माजी खासदार यांच्या मनात नेमके काय सुरू आहे याची कल्पना सध्या तरी त्यांच्या समर्थकांसह विरोधकांना देखील येत नाही.
या ठिकाणाहून घेतले उमेदवारी अर्ज
माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व आणि वैजापूर विधानसभा मतदार संघातील उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. यामुळे जलील यांना अद्यापही सुरक्षित मतदारसंघ मिळाला नाही की त्यांना राजकीय संभ्रम निर्माण करायचा आहे अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, जलील यांनी नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढण्याचे देखील जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांच्या आगामी राजकीय पावलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.