अहिल्यानगर : विशेष प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणची लढत सर्वाधिक गाजली. पारनेर विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा देत निलेश लंके यांनी ‘तुतारी’ हाती घेत सुजय विखेंविरोधात दंड थोपटले. राज्याचे लक्ष लागलेल्या या लढतीत निलेश लंके यांनी सुजय विखेंच्या साम्राज्याला हादरा देत दिल्लीचे तिकीट मिळवले. लोकसभेतील या विजयानंतर आता रिक्त झालेल्या पारनेर विधानसभेतही निलेश लंके पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करण्याच्या तयारीत आहेत, त्यासाठी ते त्यांच्या पत्नी राणी लंके यांना उतरविले असून उमेदवारी अर्जही दाखल केला.
पारनेर विधानसभा मतदार संघामध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये लढत झाली होती. या निवडणुकीतही निलेश लंके यांनी बाजी मारली होती. निलेश लंके यांनी या निवडणुकीत तब्बल तीन वेळा आमदार राहिलेल्या शिवसेनेच्या विजय औटी यांचा पराभव करत किंगमेकर ठरले होते. यावेळी निलेश लंके १,३९,९६३ मतांनी विजयी झाले होते, तर शिवसेनेचे विजय औटी यांचा ५९, ८३८ मतांनी पराभव झाला होता. त्याआधी २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विजय औटी यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली होती. त्यांचा ७३,२६३ मतांनी विजय झाला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुजित झावरे यांचा २७,४२२ मतांनी पराभव झाला होता.
दरम्यान, सध्या होणा-या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके उतरल्या आहेत. मात्र त्यांच्या या निर्णयाला विरोधही होत आहे. पारनेरमध्ये निलेश लंके यांना घेरण्यासाठी कधी काळी त्यांचे निकटवर्ती असलेले पारनेर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी विरोधात भूमिका घेतली आहे. तसेच निवडणूक लढविण्याचे संकेतही दिले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत निलेश लंके काय डाव टाकणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.