पालम : तालुक्यात सतत दोन दिवसांपासून पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांची तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी बुधवार, दि.२९ रोजी शेतक-यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
पालम तालुक्यात दि.२७ व २८ या दोन दिवसाच्या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील रब्बी हंगामासह खरीप हंगामातील अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वेचणीत आलेला कापूस वेचून शेतात ठेवला होता. याच कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत कपाशीला कोंब फुटत असल्याने शेतक-यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. जवारी, हरभरा, तुर या पिकांनाही जबर झटका बसला आहे. अनेक राजकीय, सामाजिक संघटनेने शेतक-यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे केली होती.
या मागणीची दखल घेत तहसीलदार वाघमारे यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतक-यांना दिलासा दिला. यावेळी कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी अभय हनवते, कृषी अधिकारी नागनाथ दुधाटे, मंडळाधिकारी दत्तराव दुधाटे, तलाठी नामदडे, उपसभापती भाऊसाहेब पौळ, गुळखंड उपसरपंच पोळ आदींची उपस्थिती होती.
तालुका कृषी अधिकारी अवतरले
राज्य शासनाने शेतक-यांच्या समस्या निवारणासाठी तालुका कार्यालय मार्फत कृषी अधिका-यांची नियुक्ती केली आहे. परंतू हे अधिकारी आजपर्यंत कधीच आले नाहीत. परंतु तहसीलदार यांनी तात्काळ शेतक-यांच्या नुकसानाची दखल घेऊन कृषी अधिका-यांना शेतक-यांच्या बांधावर येण्यास भाग पाडल्याने शेतक-यांत समाधान व्यक्त होत आहे.