मुंबई : प्रतिनिधी
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २९ ऑक्टोबर अखेरची तारीख असल्याने आता उर्वरित जागांवरील उमेदवार घोषित करायला सुरुवात केली असून, कॉंग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, भाजपनेही आज उमेदवार घोषित केले. त्यामुळे आज ब-याच ठिकाणच्या लढती स्पष्ट झाल्या आहेत. कॉंग्रेस पक्षाने अनेक ठिकाणी नव्या चेह-यांना संधी दिली. त्यात छ. संभाजीनगरमधून मधुकर देशमुख, निलंग्यातून अभय साळुंके यांचा समावेश आहे.
निलंग्यात आता माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकरविरुद्ध अभय साळुंके यांच्यात लढत होणार आहे. ठाकरे गटाने हिंगोलीतून रुपाली पाटील, परतूरमधून आसाराम बोराडे यांना, शरद पवार गटाने गंगापूरमधून सतीश चव्हाण, परंड्यातून राहुल मोटे, बीडमधून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिली. तसेच येवल्यात भुजबळांविरुद्ध मराठा कार्ड खेळत माणिकराव शिंदे यांना संधी दिली. भाजपनेही लातूर ग्रामीणमधून रमेश कराड यांना उमेदवारी दिली. त्यामुळे लातूर ग्रामीणमध्ये आमदार धिरज विलासराव देशमुखविरुद्ध रमेश कराड अशी लढत रंगणार आहे.
कॉंग्रेस पक्षाने आज २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून, आतापर्यंत एकूण ७१ उमेदवार घोषित केले आहेत. आज मराठवाड्यातील काही जागांसह विदर्भ, उत्तर महाराष्ट्र मुंबईतील जागांची घोषणा केली. सावनेरमधून सुनील केदार यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी दिली. तसेच नागपूर द.मध्ये गिरीश पांडव, कामठीतून सुरेश भोयर यांना संधी दिली. राष्ट्रवादीकडे असलेला अर्जुनी मोरगाव कॉंग्रेसने आपल्याकडे घेऊन येथून माजी आमदार दिलीप बनसोड, राळेगावमधून माजी मंत्री वसंत पुरके, आर्णीत शिवाजीराव मोघे यांचे चिरंजीव जितेंद्र मोघे यांना उमेदवारी दिली.
तसेच जालन्यात पुन्हा कैलास गोरंट्याल यांना मैदानात उतरविले. त्यामुळे येथे शिंदे गटाचे अर्जुन खोतकरविरुद्ध गोरंट्याल अशीच लढत होणार आहे. छ. संभाजीनगर पूर्वमध्ये मधुकर देशमुख या नव्या चेह-याला संधी दिली. शिरोळमधून गणपतराव पाटील यांना संधी दिली. श्रीरामपूरमधूनही हेमंत ओगले या नव्या चेह-याला संधी दिली आहे. सर्वांत चर्चेची जागा म्हणजे लातूर जिल्ह्यातील निलंगा मतदारसंघाची आहे. येथे कॉंग्रेसकडून सातत्याने अशोकराव पाटील निलंगेकरांना संधी दिली. परंतु सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत असल्याने यावेळी त्यांच्याऐवजी आता नवा चेहरा म्हणून अभय साळुंके यांना संधी दिली आहे. त्यामुळे निलंगा येथून अभय साळुंके विरुद्ध भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात लढत रंगणार आहे. मनसेनेही आज १५ उमेदवारांची ५ वी यादी जाहीर केली.
शरद पवार गटाने नाशिक जिल्ह्यातही तगडे उमेदवार मैदानात उतरवले आहेत. येवल्यातून छगन भुजबळांविरोधात मराठा कार्ड खेळले असून, माणिकराव शिंदे यांना मैदानात उतरविले आहे. यासोबत सिन्नरमधून माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात उदय सांगळे यांना उमेदवारी दिली आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे आमदार राहुल ढिकले यांच्या विरोधात गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते यांना उमेदवारी दिली. बागलाण विधानसभा मतदारसंघातून दीपिका चव्हाण यांना भाजपचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांच्याविरोधात मैदानात उतरवले. दिंडोरीतून नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात सुनिता चारोस्कर यांना उमेदवारी जाहीर केली. अकोलेतून किरण लहामटे यांच्या विरोधात अमित भांगरे यांना उमेदवारी दिली. अहिल्यानगरमधून संग्राम जगताप यांच्या विरोधात अभिषेक कळमकर यांना संधी दिली. भूम-परांडा मतदारसंघातून ठाकरे गटानंतर आता शरद पवार गटानेही आपला उमेदवार जाहीर केला. तेथे ठाकरे गटाने दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा मुलगा रणजित पाटील यांना उमेदवारी दिली होती. मात्र, शरद पवार गटाने या जागेवर दावा केल्याने ठाकरे गटाने माघार घेतल्याचे समजते.
भाजपने २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात लातूर ग्रामीणमधून रमेश कराड यांना संधी दिली. येथे आता आमदार धिरज विलासराव देशमुख आणि कराड यांच्यात लढत रंगणार आहे. सोलापूर मध्य येथे महेश कोठे यांचे पुतणे देवेंद्र कोठे यांना संधी दिली आहे. महेश कोठे यांना शरद पवार गटाने सोलापूर उत्तरमधून संधी दिली. अकोला पश्चिममध्ये दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्याजागी विजय अग्रवाल यांना संधी दिली. अकोटमध्ये आ. प्रकाश भारसाकळे यांना पुन्हा संधी दिली. गडचिरोलीत विद्यमान आमदार देवराव होळी यांना डच्चू देत डॉ. मिलिंद नरोटे यांना, राजुरामधून देवराव भोंगळे या नव्या चेह-याला संधी दिली. ब्रम्हपुरीत कॉंग्रेसचे वडेट्टीवार यांच्या विरोधात कृष्णलाल सहारे, वरोरा येथून करण देवतळे, वाशिममधून लखन मलिक यांना डच्चू देत शाम खोडे, मेळघाटमधून केवलराम काळे यांना संधी दिली. सोलापूर मध्यमधून देवेंद्र कोठे यांना उमेदवारी मिळाली. ही जागा शिवसेनेची होती. कसबा पेठमधून पुन्हा हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने तिथे रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर यांच्यात लढत होणार आहे.