पुणे : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बारामतीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अजित पवार यांनी बारामतीत मोठे शक्तिप्रदर्शन केले. दुसरीकडे अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. युगेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: शरद पवार उपस्थित होते.
दरम्यान, विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या २९ ऑक्टोबर रोजी शेवटचा दिवस असल्यामुळे आज राज्यातील अनेक दिग्गज नेते आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली होती. त्यानंतर आता काका आणि पुतण्यात लढत होणार आहे.
मी चूक केली, त्यांनीही करायला नको होती : अजित पवार
या वेळी युगेंद्र पवारांसंदर्भातच बोलताना आज अजित पवारांनी बारामतीत एक मोठे विधान केले. लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभे करून मी चूक केली. पण आता युगेंद्र पवार यांना माझ्या विरोधात उभे करून तीच चूक त्यांनी (शरद पवार यांनी) करायला नको होती, असे अजित पवारांनी म्हटले आहे. लोकशाहीत निवडणुकीमध्ये सर्वांना उभं राहण्याचा अधिकार आहे. या निवडणुकीत देखील बारामतीकर चांगल्या मताधिक्याने मला निवडून देतील असा मला विश्वास आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
बारामतीत काका विरुद्ध पुतण्या
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काका-पुतण्या आमने-सामने आहेत. अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे पुतणे आणि अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळत आहे.