नाशिक : प्रतिनिधी
देशभरात आजपासून दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. फटाके, नवीन कपडे, फराळ यांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळत आहे. दिवाळीसाठी लोक आपल्या गावी जात असतात आणि सण साजरा करत असतात.
अशातच आता नाशिकमधून शेतक-यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दिवाळीनिमित्त नाशिक कृषि बाजार समितीमध्ये सुरू असलेले लिलाव कांदा आणि टोमॅटोचे लिलाव दोन दिवस बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच बहुतांश बाजारपेठा आजपासून म्हणजेच २८ ऑक्टोबरपासून ५ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. काही बाजार समित्यांमध्ये दोन दिवस लिलाव सुरू राहणार आहे.
नाशिक जिल्हा हा भाजीपाला उत्पादनासाठी अग्रेसर आहे. या जिल्ह्यातील शेतकरी भाजीपाला पिकाचे सर्वांत जास्त उत्पादन घेतो. नाशिकमध्ये चौदा बाजार समित्या आहेत. या सर्वच बाजारपेठांमध्ये मोठी आवक पाहायला मिळते. यामध्ये विशेषत: कांदा आणि टोमॅटो या पिकाची आवक सर्वाधिक असते. मात्र दिवाळीच्या अनुषंगाने लिलाव बंद राहणार आहेत. तर काही बाजारपेठांमध्ये पुढील दोन दिवस लिलाव सुरू ठेवण्यात आले आहेत.
मजूर गावी जातात
देशभरात दिवाळी साजरी केली जाते. या कालावधीत शाळा, शासकीय कार्यालये यांना सुट्या दिल्या जातात. तसेच बाजार समितीमध्ये काम करणारे लोक देखील दिवाळीत आपापल्या गावी जात असतात. त्याचा परिणाम हा लिलावावर होत असतो. म्हणून दिवाळीमध्ये बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.