26.6 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रअमित ठाकरेंविरोधात निवडणूक लढण्यास सदा सरवणकर ठाम

अमित ठाकरेंविरोधात निवडणूक लढण्यास सदा सरवणकर ठाम

मुंबई : प्रतिनिधी
माहिम विधानसभा मतदारसंघातून यंदा तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे सदा सरवणकर, मनसेचे अमित ठाकरे अन् शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, लोकसभेला राज ठाकरेंनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे राज्यातील काही मतदारसंघांत भाजपा आणि मनसेत मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे माहिममधून सदा सरवणकर यांचा अर्ज मागे घेण्याची मागणी जोर धरू लागली. परंतु, सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा पहिल्यांदाच अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली असून माहिममधून ते निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी केली जातेय. परिणामी सदा सरवणकर यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव वाढला होता. येत्या २४ तासांत त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी, असे म्हटले गेले होते. परंतु, त्यांनी एक्सवरून उद्या म्हणजेच २९ ऑक्टोबर रोजी अर्ज भरायला जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

‘निवडणुकीचे साहित्य पक्षाकडून आलेले आहे. एबी फॉर्म आलेला आहे. त्यामुळे या चर्चा माध्यमांमध्येच आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दबाव माझ्यावर कोणीही केलेला नाही. उद्या सकाळी १० वाजता मी उमेदवारी अर्ज भरणार आहे, असे सदा सरवणकर म्हणाले.

केसरकरांनीही मनसेला पाठिंबा द्यावा
राज ठाकरेंवरील प्रेमापोटी आशीष शेलार मनसेला पाठिंबा द्या म्हणत असतील. दीपक केसरकरही असे म्हणत असतील तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघातून मनसेला पाठिंबा द्यावा. आम्ही या मतदारसंघात ३० वर्षांपासून काम करतो ’, असे सदा सरवणकर म्हणाले. मुंबईतील असा कोणताही प्रश्न नसेल ज्याला आम्ही स्पर्श केला नसेल. त्यामुळे मतदारांच्या पूर्ण लक्षात आहे की आपले काम कोण करणार आहे, हा विश्वास आहे, असे सदा सरवणकर म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR