27.1 C
Latur
Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्रनेत्यांचा इन्कार; मात्र महायुतीत मैत्रीपूर्ण लढत

नेत्यांचा इन्कार; मात्र महायुतीत मैत्रीपूर्ण लढत

एकाच मतदारसंघात दोघांना एबी फॉर्म

नागपूर : विशेष प्रतिनिधी
महायुतीचे वरिष्ठ नेते मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, असा दावा करत असले तरी विदर्भातील वरुड मोर्शी या मतदारसंघात तशीच स्थिती निर्माण झाली आहे. वरुड मोर्शीचे विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांनी काही दिवसांपूर्वी अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. आज त्यांनी वरुड मोर्शी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्याकडून त्यांना ए बी फॉर्म मिळाल्याचा दावा केला.

दुस-या बाजूला वरुड मोर्शी मधील भाजप नेते उमेश यावलकर यांचाही काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश झाला होता. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पुन्हा प्रवेश घेणा-या उमेश यावलकर यांचा दावा आहे की, भाजपने त्यांना एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे एकाच मतदारसंघातून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दावेदार फक्त दावेदारीच करत नाहीत तर त्यांच्या पक्षाने त्यांना एबी फॉर्म दिल्याचा दावाही करत आहेत. त्यामुळे वरुड मोर्शी महायुतीमधील मैत्रीपूर्ण लढतीचे केंद्र बनेल आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

देवेंद्र भुयार यांनी विधानसभेची उमेदवारी मिळवण्याच्या दृष्टीने अजित पवार गटात प्रवेश केला होता. मात्र, पहिल्या दोन उमेदवार याद्यांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे देवेंद्र भुयार मुंबईत ठाण मांडून बसले होते. मात्र, अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याने देवेंद्र भुयार नाराज होऊन माघारी परतले. यानंतर त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या स्टेटसला ‘उमेदवारी अर्ज भरायला चला’, असे स्टेटस ठेवले होते. त्यामुळे देवेंद्र भुयार अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असे दिसत होते. मात्र, अजित पवार गटाकडून त्यांना शेवटच्या क्षणी एबी फॉर्म मिळाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR