नवी दिल्ली : पाकिस्तानी तरुणाच्या प्रेमात पडून भारत सोडून पाकिस्तानला गेलेली अंजू पुन्हा मायदेशी परतली आहे. अंजू बुधवारी वाघा बॉर्डरमार्गे भारतात परतली. सहा महिन्यांपूर्वी ती भारतातून पाकिस्तानात पोहोचली होती. पाकिस्तानात दाखल झाल्यानंतर ती पाकिस्तानी मित्र नसरुल्लाहशी विवाहबद्ध झाली होती. दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती.
३४ वर्षीय अंजू जुलैमध्ये तिच्या फेसबुक मित्र नसरुल्लाला भेटण्यासाठी पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथे गेली होती. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अंजूने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर नसरुल्लासोबत लग्न केले होते. यासोबतच अंजूने तिचे नाव बदलून फातिमा ठेवले आहे. अंजूने पाकिस्तानात पोहोचून विवाह केला. त्यानंतर तिचा पती नसरुल्लाहने अंजू २० ऑगस्ट रोजी पुन्हा भारतात परतणार असल्याचे म्हटले. २० ऑगस्ट रोजी तिचा पाकिस्तानचा व्हिसा संपत होता. मात्र, विवाहाचे प्रकरण समोर आल्यानंतर ऑगस्टमध्ये पाकिस्तानने अंजूचा व्हिसा एक वर्षासाठी वाढवला होता.
सप्टेंबरमध्ये अंजूचा पती नसरुल्ला याने सांगितले की, त्याची पत्नी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे आणि तिला आपल्या मुलांची खूपच आठवण येत आहे. अंजू पुढील महिन्यात भारतात परतणार असल्याचे नसरुल्लाह यांनी सांगितले होते. नसरुल्लाहने वृत्तसंस्थेशी फोनवर बोलताना सांगितले की, अंजूचे मानसिक आरोग्य बिघडू नये अशी माझी इच्छा आहे. तो म्हणाला की अंजूने आपल्या मुलांना भेटण्यासाठी तिच्या देशात जाणे चांगले आहे. पाकिस्तानात कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करून ती परत जाणार असल्याचे तिने सांगितले.