19 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्र‘आनंदाचा शिधा’ लांबणीवर, दिवाळीच्या उत्सवावर विरजण

‘आनंदाचा शिधा’ लांबणीवर, दिवाळीच्या उत्सवावर विरजण

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
स्वस्त धान्याचा लाभ मिळणा-या लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या वतीने १०० रुपयांत आनंदाचा शिधा दिला जातो. यावर्षी दिवाळीला मिळणारा आनंदाचा शिधा मात्र आचारसंहितेमुळे वितरित झाला नाही. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

उत्सव काळात स्वस्त धान्य लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने १०० रुपयांत चार प्रकारचे शिधा जिन्नस दिले जातात. दिवाळी सणानिमित्त मागील वर्षी शिधा जिन्नसचे वाटप करण्यात आलेले होते; परंतु यावर्षी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने आनंदाचा शिधा वितरणात अडचणी आहेत. विशेष म्हणजे, १ नोव्हेंबरपासून रास्त भाव दुकानदारांनी पुकारलेला बंद मागे घेण्यात आला असला, तरी लाभार्थ्यांना दिवाळीनंतरच धान्य मिळणार आहे.

रास्त भाव दुकानाच्या माध्यमातून अंत्योदय, प्राधान्य गट योजनेचे हजारो लाभार्थी आहेत. या सर्वांना सरकारने सण-उत्सव काळात आनंदाचा शिधा ही योजना रास्त दुकानाच्या माध्यमातून देणे सुरू केले.

प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा मिळू लागला. या दिवाळीतही आनंदाचा शिधा मिळण्याची शक्यता होती; परंतु मध्येच आचारसंहिता सुरू झाल्याने ऐन दिवाळीत आनंदाचा शिधा वितरणात आडकाठी येत असल्याचे दिसून येते.

लाभार्थ्यांचा प्रश्न, शिधा केव्हा मिळणार?
आनंदाचा शिधा कधी मिळणार, म्हणून लाभार्थी रास्त भाव दुकानदारांना विचारत आहेत. आचारसंहिता सुरू असल्यामुळे आनंदाचा शिधा हा नवीन सरकार आल्यानंतरच मिळेल काय, असा सवाल लाभार्थ्यांचा आहे.

२०२२ पासून आनंदाचा शिधा
लाभार्थ्यांना आनंदाच्या शिध्यात साखर, पामतेल, रवा, मैदा, तूरडाळ, आदी शिधा जिन्नस प्रत्येकी एक किलो मिळते. २०२२ पासून दिवाळी, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती सणाला आनंदाचा शिधा मिळाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR