लातूर : प्रतिनिधी
दीपावालीच्या पार्श्वभुमीवर शहरातील बाजारात रेडीमेड फराळ दाखल झाला आहे. विविध व्यापारी वर्गांकडून रेडीमेड फराळ तयार केला जात असून, त्या फराळाला ग्राहकांची मोठी मागणी आहे. यात लाडू, चिवडा, शंकरपाळी आदीचा समावेश आहे. यात यावेळी आकर्षण असलेली चंद्रकला करंजी ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. यंदा तयार फराळ सुमारे ३० टक्क्यांनी महागला असून नोकरदार वर्गाची या तयार फराळा मोठी मागणी आहे.
पूर्वीच्या काळी दिवाळीला काही दिवस असताना घरोघरी फराळाचे पदार्थ तयार केले जायचे. मात्र, आता अनेक महिला नोकरी व व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांना फराळ तयार करण्यास वेळ मिळत नसल्याने अनेकजण रेडिमेड फराळाला प्राधान्य देत असतात. या पार्श्वभूमीवरच सध्या लातूरच्या बाजारात फराळाची दुकाने स्वादिष्ट पदार्थांनी सजली आहे. फराळ बनविण्याचे काम दिवाळीच्या आठवडा आधी पुर्ण होतात. झालेले फराळ सध्या बाजारात दाखल झाले आहेत. यात सध्या चकली, शंकरपाळी, बेसन, रवा, मूग आदीपासून तयार केलेले लाडू, खोब-यांच्या वडया, चणा-डाळीच्या वडया, पोह्याचा तिखट, गोड चिवडा, चुरमा, शेव, बाकरवडी, अनारसे आदी फराळाचा समावेश आहे. या सर्वाच्या किंमती वेगवेगळया आहेत. गतवर्षाच्या तूलनेत यंदा दिवाळीमध्ये बाजारातील फराळाची मागणी अधिक वाढू लागली आहे. घरात फराळ बनवण्यापेक्षा नागरिकांनी तयार फराळाला पसंती दर्शवली असल्याचे व्यापरी वर्गानी सागीतले. खाद्यतेलांचे भाव प्रचंड वाढले असून अन्य वस्तूंच्या किमतीतही मोठी वाढ झाल्याने यंदा दिवाळीचा तयार फराळही महागला आहे. त्यामुळे घरगुती फराळ कमी झाला असून तयार फराळ विकत घेण्यासाठी मागणी वाढली आहे.
दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी लागणा-या डाळ, तेल, साखर, सुकामेवा आदींच्याही किमती वाढल्यामुळे तयार फराळाच्या दरामध्येही यंदा २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीचा भार आता ग्राहकांच्या खिशाला बसला आहे. बाजारात भाजणी चकली ४०० रुपये प्रतिकिलो, तिखट शेव ३८० रुपये प्रतिकिलो, बेसन लाडू ६०० ते ७५० रुपये प्रतिकिलो, रवा लाडू ६०० रुपये प्रतिकिलो, करंजी ७०० रुपये प्रतिकिलो, करंजी बेसन सारण ७५० रुपये प्रतिकिलो, शंकरपाळे ४५० रुपये प्रतिकिलो तर काही ठिकाणी लाडू, करंजी हे नगावर मिळत असून एक नग २० ते ३० रुपयाला बाजारात दाखल झाले आहेत.
हल्ली नोकरी करणा-या महिलांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नोकरी सांभाळून दिवाळीचा फराळ करणे महिलांना जमत नाही. त्यामुळे त्यांचा कल रेडीमेड फराळाकडेच असतो. ऑफीसमधून सुटयाही मिळत नसल्याने ऑफीसमधून घरी येताना रेडीमेड फराळ आणायचा व दिवाळी साजरी करायची याकडे महिलानाचा कल वाढला आहे. पण दुकानातून फराळ विकत घेण्यापेक्षा घरगुती फराळ विकत घेण्याला महिला प्राधान्य देत आहेत.