सेलू / प्रतिनिधी
येथील श्रुती संगीत विद्यालय प्रस्तुत व संयोजक गंगाधर कान्हेकर, रवी कुलकर्णी व रवी मुळावेकर यांच्या दिवाळी पहाट या सुश्राव्य अशा संगीत समारोह कार्यक्रमात सहभागी गायकांनी अत्यंत सुरेख गाणी गाऊन श्रोत्यांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले. यावेळी तबल्याची साथ रामदास कुलकर्णी यांनी दिली तर सच्चिदानंद डाखोरे व हभप प्रद्युम्न सावरगावकर यांनी संवादिनी साथ दिली. यावेळी दिवाळी पहाट कार्यक्रमात सहभागी कलावंतांनी एकापेक्षा एक अशा सरस गाण्यांनी उपस्थित रसिक श्रोत्यांची मने जिंकून घेत दाद मिळवली.
यावेळी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, गोविंदभाऊ जोशी, महेशराव खारकर, अशोकराव काकडे, संतोष कुलकर्णी, रवी कुलकर्णी, यशवंत चारठाणकर, गंगाधर कान्हेकर, रवी मुळावेकर, किशोर जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी सौ. अलका धर्माधिकारी यांनी स्वागत गीत भूपाळी सादर केली. सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय हभप प्रा. संजय पिंपळगावकर यांनी करून दिला. यावेळी रामदास कुलकर्णी यांनी अत्यंत सुरेख स्वतंत्र तबला वादन सादर केले. ज्या मध्ये बनारस घराण्याचा कायदा सादर करून श्रोत्यांच्या टाळ्या मिळवल्या. मान्यवरांच्या हस्ते कलावंतांचे स्वागत करण्यात आले. या अत्यंत सुरेल अशा गायन कार्यक्रमात वरद विवेक दलाल यांनी राग भैरव, राग देसकार, नाट्यगीत, अभंग, एकापेक्षा एक अशी सरस गाणी गाऊन उपस्थित श्रोत्यांची मने जिंकून दाद मिळवली. यामध्ये त्यांनी शास्त्रीय संगीत सादर केले. यावेळी शहरातील रसिक श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.