कोलकाता : वृत्तसंस्था
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आम्ही देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच सीएए लागू करणारच, असा ठाम निर्धार व्यक्त केला. पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असून या घुसखोरीमुळे राज्याचा कधीच विकास होणार नाही, असेही शाह म्हणाले.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील धर्मतला येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यान्ांी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला. आसामच्या जनतेने तिथे भाजपाचे सरकार आणले. आता त्यांच्या सीमेवरून चिटपाखरूसुद्धा इकडे फिरकू शकत नाही. पण बंगालची परिस्थिती वेगळी आहे. बंगालमध्ये समाजमाध्यमांवर काहीजण लिहितात की तुम्ही घुसखोरी करून बंगालमध्ये आला असाल आणि तुम्हाला आधार कार्ड, भारतीय मतदान ओळखपत्र बनवून हवे असेल तर अमूक नंबरवर फोन करा. परंतु यावर बंगाल पोलिस चिडीचूप आहेत, असेही अमित शाह म्हणाले.
ज्या राज्यात मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असेल, तिथे विकास होऊ शकतो का, त्यामुळेच ममता बॅनर्जी या सीएएचा विरोध करत आहेत. पण मी आज या जाहीर सभेतून ममता दिदींना सांगून जातो की, सीएए हा या देशाचा कायदा आहे. याला कोणीच रोखू शकत नाही. आम्ही सीएए लागू करूनच स्वस्थ बसणार, असेही शाह म्हणाले.