इस्लामाबाद : पाकमध्ये शुक्रवारी मोठा बॉम्बस्फोट झाला असून ज्यामध्ये ५ शाळकरी मुले आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २२ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये बहुतांश शाळकरी मुलांचा समावेश आहे. हा हल्ला रिमोट कंट्रोल बॉम्बच्या साह्याने करण्यात आला. दक्षिण पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील सिव्हिल हॉस्पिटल चौकात हा स्फोट झाला.
मस्तुंग जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटल चौकातील हायस्कूलजवळ सकाळी ८.३५ वाजता झालेल्या बॉम्बस्फोटात पोलिस व्हॅनला टार्गेट करण्यात आले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. कलात विभागाचे आयुक्त नईम बाजई म्हणाले, स्फोटात आयईडी (इम्प्रोव्हायझ्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस) वापरण्यात आले होते. शाळेजवळ उभ्या असलेल्या पोलिसांचे वाहन त्यांचे टार्गेट होते.
आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून त्यात पाच शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या हल्ल्यात २२ जण जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्या जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.