बीड : प्रतिनिधी
बीडमध्ये मात्र दोन पुतण्यांच्या विरोधात काकांनी अर्ज दाखल केल्याने एकाच कुटुंबातले तिघे जण आमने-सामने होते. बीडमध्ये काका-पुतण्यांनी अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र काका-पुतण्यांच्या लढाईत काकांनी माघार घेतली असून दोन भावांमध्ये आता लढत होणार आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अर्ज मागे घेतला आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. राज्यात अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीची डोकेदुखी वाढली होती. बहुतांश ठिकाणी बंड थंड करण्यात पक्षांना यश आले आहे.
अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यातल्या बीड मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादीने योगेश क्षीरसागर यांना तिकिट दिले आहे. तर शरद पवार गटाकडून योगेश यांचे चुलत भाऊ विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना तिकिट देण्यात आले आहे. तर जयदत्त क्षीरसागर यांनीही अर्ज भरला होता. पण आता त्यांच्या माघारीमुळे दोन भावांमध्ये ही लढत होणार आहे. आता कोणत्या पुतण्याला काका रसद पुरवणार हे बघावे लागेल.
गेल्यावेळी काकांना पुतण्याची धोबीपछाड
जयदत्त क्षीरसागर यांनी २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळवला होता. पण २०१९ च्या निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादीला रामराम केला आणि शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हा शिवसेनेने त्यांना मंत्रिपदही दिले. पण २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला.
क्षीरसागर कुटुंबाची २५ वर्षांपासून सत्ता
बीड शहरात गेल्या दोन ते तीन दशकांपासून क्षीरसागर कुटुंबियांची एकहाती सत्ता आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद, आमदारकीची पदं घरातील व्यक्तींकडेच आहेत. दरम्यान, भावांमधील संघर्षामुळे क्षीरसागर कुटुंबात फूट पडल्यानंतर काका-पुतण्या आमने-सामने आले.