कोल्हापूर : अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी मविआच्या मधुरीमाराजे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने काँग्रेस पक्षाची नाचक्की झाली. शिंदे सेनेकडून राजेश क्षीरसागर लढत आहेत. तर बंडखोर राजेश लाटकर त्यांच्या विरोधात लढतील. दम नव्हता तर उमेदवारी कशाला घेतली? असा प्रश्न करून काँग्रेस नेते सतेज पाटील रागारागाने जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून गेले.
दरम्यान, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात दुस-यांदा मोठा उलटफेर बघायला मिळतो आहे. राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरीमाराजे यांना तिकिट देण्यात आले होते. एबी फॉर्म देऊन त्यांनी अर्जही भरला. मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी त्यांनी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे अधिकृत उमेदवारानेच माघार घेतल्याने काँग्रेसची नाचक्की झाली.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांची उमेदवारी कापून काँग्रेसने राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. परंतु पक्षातील वरिष्ठांनी लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरीमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यांना एबी फॉर्म देऊन त्यांचा उमेदवारी अर्जही भरला गेला. दरम्यानच्या काळात राजेश लाटकर प्रचंड नाराज होते. त्यांनी काँग्रेस पक्षावर उमेदवारीवरून आरोप केले. लाटकर हे पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. त्यांची नाराजी पक्षाला परवडणार नाही, असे सांगून मधुरीमाराजे यांनी अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेतला, असे खासदार शाहू छत्रपती यांनी सांगितले.
सतेज पाटील चिडले!
मधुरीमाराजे यांनी अर्ज मागे घेताच सतेज पाटील प्रचंड भडकलेले पाहायला मिळाले. दम नव्हता तर उमेदवारी कशाला घेतली? अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. जर लढायचे नव्हते तर उमेदवारी घ्यायलाच नको होती. मी माझी ताकद दाखवली असती, अशा शब्दांत त्यांनी मधुरीमाराजे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
लाटकर यांची अखेरपर्यंत माघार नाहीच
राजेश लाटकर यांनी अर्ज माघारी घ्यावा, यासाठी सतेज पाटील यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. तसेच छत्रपती घराण्याकडून देखील राजेश लाटकर यांची निवासस्थानी जाऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला. मात्र राजेश लाटकर निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी ते काय काय करणार, दबावातून अर्ज माघार घेणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागलेले होते. मात्र मुदत संपण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत राजेश लाटकर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे नाइलाजाने मधुरीमाराजे यांनी आपला अर्ज माघारी घेतला.