पुणे : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार आणणे हे उद्दिष्ट असून लोकसभा निवडणुकीत जी नकारात्मक भूमिका मांडली होती, त्याचे नेमके स्वरूप मतदारांना उलगडले आहे. त्यामुळे मतदार महायुतीच्या बाजूने राहिले असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आणि आमदार पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
चार दिवस आमदार मुंडे पुणे जिल्हा दौ-यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती सांगितली. त्या म्हणाल्या, सन २०१४ ते २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत दिले.
त्याप्रमाणे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सत्तेमध्ये येईल. पुणे जिल्ह्यात विधानसभेच्या २१ जागा असून त्या महायुती जिंकेल असे त्यांनी नमूद केले. निवडणुकीत बंडखोरी कमी करण्यात पक्षनेतृत्वाला यश मिळाले आहे असे नमूद करून त्या म्हणाल्या, काही मतदारसंघांत मैत्रीपूर्ण लढत होते आहे पण हा विषय अंतर्गत आहे.