जयपूर : राजस्थानच्या सवाई माधोपूर येथील वाघांसाठी प्रसिद्ध असलेले रणथंबोर राष्ट्रीय उद्यान सध्या चर्चेत आले आहे. रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातून वर्षभरात ७५ पैकी २५ वाघ बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता वाघांचा शोध घेण्यासाठी तीन सदस्यीय तपास पथक तयार करण्यात आले आहे. तपास पथक या प्रकरणाचा अहवाल दोन महिन्यांत मुख्य वन्यजीव वॉर्डन कार्यालयाला सादर करणार आहे.
विशेष म्हणजे, एका वर्षांत एवढ्या मोठ्या संख्येने वाघ बेपत्ता झाल्याचा अधिकृत अहवाल येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी, जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२२ दरम्यान रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातून १३ वाघ बेपत्ता झाले होते. रणथंबोरमधून वर्षभरात २५ वाघ बेपत्ता झाल्याच्या वृत्ताने वनविभागाच्या अधिका-यांना धक्का बसला आहे. वाघ बेपत्ता झाल्याची बातमी विभागीय व्याघ्र निरीक्षण अहवालातूनन समोर आली आहे. याप्रकरणी प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. के. उपाध्याय यांनी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली असून ही चौकशी समिती रणथंबोरमधून बेपत्ता झालेल्या वाघांचा अहवाल दोन महिन्यांत सादर करणार आहे.
चौकशी समितीची स्थापना
पवनकुमार उपाध्याय यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. यात अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक टी मोहनराज जयपूर आणि मानस सिंग यांची चौकशी समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही चौकशी समिती वाघ बेपत्ता झाल्यानंतर शोधण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची चौकशी करेल. यासोबतच कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचा-याचा निष्काळजीपणा आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. रणथंबोरच्या व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी ही समिती आपल्या सूचनाही देईल.
देखरेख नीट होत नव्हती
रणथंबोरमधून वाघ बेपत्ता होत असल्याने तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मते, वाघांची संख्या वाढत आहे, वाघांना प्रदेशासाठी पुरेशी जागा मिळत नाही, त्यामुळे वाघांमध्ये परस्पर संघर्ष वाढत असून कमजोर वाघ रणथंबोरमधून बाहेर पडत आहेत. तसेच, अनेक वेळा शक्तिशाली वाघाशी संघर्ष होऊन दुर्बल वाघाचा मृत्यूही होतो. विभागीय अधिका-यांच्या निष्काळजीमुळे अनेक वेळा मृत वाघांचा शोध लागत नाही आणि विभाग वाघ बेपत्ता झाल्याचे मानतो. रणथंबोरमधील अधिकारी व्याघ्र संवर्धनापेक्षा पर्यटनावर भर देतात, असे वन्यजीव तज्ज्ञ आणि वन्यजीवप्रेमी सांगतात.