अमरावती : धर्मांध मुसलमानांच्या धांगडधिंग्याच्या विरोधात आवाज उठवणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात मी आवाज दिला आणि ते बंद करून घेतले. हे केले म्हणून माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर १७००० केसेस टाकल्या, आणि त्यावेळेस सरकार कोणाचं होतं तर उद्धव ठाकरे-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच. माहीममध्ये एक मझार होती ती अनधिकृत होती, ती आम्ही पाडायला लावली.
माझा आज तुम्हाला शब्द देतो, माझ्या हाती सत्ता द्या, एकाही मशिदीवर भोंगा लावू देणार नाही, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. अमरावती विधानसभेचे उमेदवार पप्पू उर्फ मंगेश पाटील यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी अमरावती येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, आपण मराठी म्हणून किंवा हिंदू म्हणून कधी विचार करणार आहोत का नाही ? हिंदू फक्त दंगलीत एकत्र असतो बाकीच्या वेळेस तो हिंदू नसतो. आणि हेच बाहेरच्यांना हवं आहे. मी एक क्लिप पाहिली आज, एक मुसलमान मौलवी मशिदीतून फतवा काढतो की काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एक गठ्ठा मतदान करा असे फतवे निघत आहेत. लोकसभेला पण हेच घडलं. मग हिंदू का विखुरलेले ? असा सवालही राज ठाकरे यांनी केला.
इम्तियाज जलीलने हजारो मुसलमानांचा मोर्चा मुंबईत आणला, ही हिंमत का झाली ? कारण काँग्रेस-शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस-उद्धव ठाकरेंचे खासदार निवडून आलेत. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर अभद्र युती केल्यावर स्वर्गीय बाळासाहेबांच्या नावाच्या मागची ‘हिंदुहृदय’ सम्राट ही उपाधी काढली. नवनीत राणांचा पराभव झाल्यावर मुसलमानांनी रस्त्यावर उतरून बीभत्स आंनद व्यक्त केला. मागे एकदा अमरावतीत दंगल झाली तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विश्व हिंदू परिषद यांनी दंगेखोर मुसलमानांना सडकून काढले होते. कितीवेळ बाहेर उभं राहून करायचं, माझ्या हाती सत्ता द्या, एकेकाला चांगला सडकून काढतो, असेही राज ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, अमरावतीला आलं की मला घरी आल्यासारखं वाटतं. १९८९ साली प्रत्यक्ष राजकारणात आलो, जन्म राजकीय घरात झाला होता. पुढे राजकीय व्यंगचित्रकार झालो आणि १९८९ साली विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष झाला. १९९३ साली मी नागपूरला बेरोजगार तरुणांचा मोर्चा काढला होता. १९८९ ते १९९५ हा काळ माझा मराठवाडा आणि विदर्भात गेला. त्यातल्या त्यात विदर्भात सगळ्यात जास्त काळ अमरावतीत राहिलो. १९८८-८९ ला माझे मित्र विजय राऊत यांच्या घरी जात असे. तेव्हाच अमरावती सुंदर होतं.
माझ्या आजीचं माहेर अमरावती. अमरावतींबद्दल मला पहिल्यापासून एक आस्था आहे. पण आज हे शहर जसं आकारहीन होत गेलं ते पाहून वाईट वाटते.
आज विदर्भातील तरुण-तरुणी शिक्षण, नोकरीसाठी विदर्भात न राहता पुणे-मुंबईत जातात. याला विकास म्हणायचं ? तुम्हाला तुमच्या शहरात चांगलं शिक्षण मिळत नाही, नोक-या मिळत नाहीत याला काय अर्थ आहे ? मग तुम्हाला पिढ्यानपिढ्या विकासाचे स्वप्न दाखवले गेले त्याचे काय झाले ? तुमचे आमदारकीचे उमेदवार पण पक्ष बदलून इकडून तिकडे गेले, हे का होतं कारण तुम्ही त्यांना जाब विचारत नाहीत, असंही राज ठाकरे म्हणाले.