बीड : विशेष प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा जोरदार प्रचार सुरु आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून विविध आश्वासनं दिली जात आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील एका उमेदवाराने दिलेल्या आश्वासनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. जर मी आमदार झालो तर सर्व पोरांची लग्न करुन देऊ, असे आश्वासन शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी दिले आहे. त्यांच्या या आश्वासनाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्रातील हाय-व्होल्टेज मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणून परळी विधानसभा मतदारसंघाला ओळखले जाते. बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख यांच्यात लढत होत आहे. नुकतंच राजेसाहेब देशमुख यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी केलेल्या अजब आश्वासनाची जोरदार चर्चा रंगली आहे.
परळीतील तरुण पोरांना लग्नासाठी विचारताना लोक विचारतात, पोराला नोकरी आहे का? सरकारच देत नाही तर कशी लागणार, काही उद्योगधंदा आहे का? पालकमंत्र्याचाच उद्योगधंदा नाही तर पोरांचा कसा असेल. यामुळे सर्व पोरांचं लग्न होणं अवघड झालं आहे. त्यामुळे सर्व पोरांना मी आश्वासन देतो, जर मी आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देऊ, सगळ्या पोरांना कामधंदा देऊ, असे आश्वासन राजसाहेब देशमुख यांनी दिले.
दरम्यान बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. परळीत अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार धनंजय मुंडेंना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने राजसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या दोघांमध्ये कोण बाजी मारते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.