21.4 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरगेवराईतील लाडक्या बहिणींचे पवार, पंडितांसमोर आव्हान

गेवराईतील लाडक्या बहिणींचे पवार, पंडितांसमोर आव्हान

बीड : विशेष प्रतिनिधी
गेवराई विधानसभा मतदारसंघात पवार, पंडित या प्रस्थापितांच्या विरोधात आता लाडक्या बहिणीही मैदानात उतरल्या आहेत. वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरत या महिला उमेदवार पवार, पंडितांच्या मतांची गणिते बिघडवणार असल्याचे दिसत आहे. यात मराठा कार्ड म्हणूनही तिस-या आघाडीकडून पूजा मोरे या मैदानात आहेत. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होऊ पाहत आहे.

गेवराई मतदारसंघात १९६२ पासून आतापर्यंत पंडित आणि पवार कुटुंबातीलच आमदार झालेले आहेत. यात त्यांना मंत्रिपदेही मिळाली. परंतु गेवराई मतदारसंघात अद्यापही मोठा असा कोणताच प्रकल्प आलेला नाही. परंतु यावेळी या प्रस्थापितांच्या विरोधात महिलांनीही बाण ताणला आहे. महाराष्ट्र स्वराज्य पार्टीच्या वतीने पूजा मोरे, मनसेकडून मयुरी खेडकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रियंका खेडकर मैदानात आहेत. तिघी महिला उमेदवारांनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच मतदारसंघ पिंजून काढला आहे. आता या महिला उमेदवारांचे प्रस्थापित पंडित व पवारांसमोर आव्हान असणार आहे. आता या लाडक्या बहिणी मतांची बेरीज जुळवून कसे आव्हान देतात, याकडेही सा-यांचे लक्ष लागले आहे.

गेवराई मतदारसंघातील प्रस्थापित असलेले आघाडीचे उमेदवार बदामराव पंडित, महायुतीचे विजयसिंह पंडित आणि अपक्ष लक्ष्मण पवार हे मराठा आहेत. आता त्यांच्याविरोधात महाराष्ट्र स्वराज्य पार्टीच्या पूजा मोरे रिंगणात आहेत. मराठा आंदोलन, शेतक-यांच्या प्रश्नांवर सक्रिय असल्याने त्यांच्याकडून पवार, पंडितांच्या मतांची गणिते बिघडविली जाऊ शकतात. तर दुस-या दोन्ही महिला उमेदवार या ओबीसी म्हणून रिंगणात उतरल्या आहेत.

२१ उमेदवार रिंगणात : गेवराई मतदारसंघात ४९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील तिघांचे अर्ज अवैध ठरले. त्यानंतर सोमवारी अखेरच्या दिवशी २५ जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता २१ उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत. यातील ३ महिला आहेत, तर १८ पुरुष आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR