नवी दिल्ली : संरक्षण अधिग्रहण परिषदेने गुरुवारी एक मोठा निर्णय घेत ९७ तेजस लढाऊ विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. तसेच १५६ प्रचंड अटॅक हेलिकॉप्टरही खरेदी करण्यात येणार आहेत. दोघांची किंमत १ लाख १० हजार कोटी रुपये आहे. तेजस आणि प्रचंड हेलिकॉप्टरही स्वदेशी आहेत. यासोबतच आणखी काही संरक्षण करारांनाही मंजुरी देण्यात आली आहे. भारतीय हवाई दलासाठी तेजस मार्क १-ए लढाऊ विमाने आणि हवाई दल आणि लष्करासाठी हेलिकॉप्टर विकत घेतले जात आहेत.
परिषदेने अतिरिक्त सौद्यांनाही मान्यता दिली आहे. त्यांची एकूण अंदाजे किंमत सुमारे २ लाख कोटी रुपये आहे. भारताच्या इतिहासातील स्वदेशी उत्पादकांना मिळालेली ही सर्वात मोठी ऑर्डर असेल. मात्र, आतापर्यंत दिलेली मान्यता ही गरजेपुरती आहे. त्यानंतर कारखानदारांशी बोलणी केली जाणार असून यास वेळ लागेल. परदेशी उत्पादकांचा सहभाग असल्यापेक्षा हा कालावधी खूपच कमी असू शकतो.
एकदा अंतिम किंमतीची वाटाघाटी झाल्यानंतर, सुरक्षेबाबत निर्णय घेणाऱ्या कॅबिनेट समितीद्वारे अंतिम साइन-ऑफ केले जाईल. ही विमाने लष्करात सामील होण्यासाठी किमान १० वर्षे लागू शकतात. सुखोई एसयू-३० एमकेआय विमानाचे मोठे अपग्रेड देखील गुरुवारी मंजूर होण्याची शक्यता आहे. भारतीय वायुसेनेकडे २६० पेक्षा जास्त एसयु-३० विमाने आहेत आणि ती भारतात अपग्रेड होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये भारतात विकसित रडार, एव्हिओनिक्स आणि उपप्रणालींचा समावेश असेल.
प्रचंड लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरची पहिली तुकडी गेल्या वर्षी हवाई दल आणि लष्करात सामील झाली होती. एचएएलने विकसित केलेले, ५.८ टन वजनाचे हे ट्विन-इंजिन हेलिकॉप्टर सुमारे २१ हजार फूट उंचीवर सेवा देऊ शकते. हे प्रामुख्याने सियाचीन, लडाख आणि अरुणाचल प्रदेशातील उच्च उंचीच्या क्षेत्रांसह इतर उच्च उंचीच्या भागात तैनात करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.