25.9 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपाचे पिक वाढलंय, आता फवारणीची गरज

भाजपाचे पिक वाढलंय, आता फवारणीची गरज

गडकरींचा घरचा आहेर, कार्यकर्ता घडविण्याचे काम

मुंबई : प्रतिनिधी
एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पक्षवाढीसाठी पक्षात विचारधारेचा अभ्यास नसलेल्या अनेकांना प्रवेश देण्याचे समर्थन करीत असतात. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना पीक जोमाने आल्यानंतर जशी रोगराई पसरते. तेव्हा फवारणी करून रोगराईचा नायनाट करावा लागतो. त्याच पद्धतीने आता भाजपात कार्यकर्त्यांचा भरपूर ओघ येत आहे. त्यात चांगले दाणे आहेत, पण रोगराईदेखील आहे. त्याच्यावर फवारणी करायला लागते. ते काम आम्ही करत आहोत, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी याबाबत भाष्य केले. कार्यकर्ते घडविताना काय काळजी घेतली पाहिजे, याबाबत बोलत असताना नितीन गडकरी यांनी हे उदाहरण दिले. भारतीय जनता पार्टी ही केडरबेस संघटना असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. नवनवीन लोक पक्षात येत असतात. त्या कार्यकर्त्यांना विचारधारा समजावून सांगणे, प्रशिक्षण देणे, कार्यकर्त्याला घडवणे ही आमची जबाबदारी आहे.

हजारो कार्यकर्ते घडविल्यानंतर ते फिल्डवर काम करत असतात. पण एखादा कार्यकर्ता असे काही बोलतो की हजार कार्यकर्त्यांच्या कामावर पाणी सोडले जाते. त्यामुळे कार्यकर्त्याला घडविण्याची प्रक्रिया आमच्या पक्षात नित्य सुरू असते.

विचारभिन्नता नव्हे, तर विचारशून्यता अडचणीची
देशात आज विचारभिन्नता अडचण नाही तर विचारशून्यता ही अडचण आहे. राजकारणात आज जे लोक काम करतात, त्यांना स्वत:विषयी चिंता असते. माझे काय होईल, मला तिकीट मिळणार का, मला सत्ता द्या, हा मी वरचढ होऊ लागला आहे. समाजाची चिंता असलेला कार्यकर्ता पक्षाची ताकद आहे, अशी भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

भाजपाला संघाची गरज आहे का?
भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन्ही संघटना वेगवेगळ््या आहेत. संघ हे सांस्कृतिक संघटन आहे. संघात जे स्वंयसेवक आहेत, त्यांना राजकीय काम करण्याची इच्छा असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. दोन्ही संघटनांचा हेतू वेगवेगळा आहे. त्यामुळे त्यांचे काम स्वतंत्र सुरू असते, असेही नितीन गडकरी म्हणाले.

जात फक्त पुढा-यांच्या मनात
महाराष्ट्राच्या राजकारणात जात हा मुद्दा मागे पडत चालला आहे. जातीच्या आधारावर जर निवडणुकीचे परिणाम पाहायला गेले तर ते निकालानंतर चुकल्याचे दिसते. जात आता समाजात उरली नसून ती पुढा-यांच्या मनात उरली आहे. अनेक ठिकाणी असे पुढारी आहेत की, ज्यांच्या जातीचे मतदार त्या त्या मतदारसंघात फारसे नसतात. तरीही ते त्याठिकाणी जिंकून येत असतात. काही निवडक पुढारी जातीचे राजकारण करत असतात. मात्र लोकांचा कल आता विकासाकडे आहे, असे गडकरी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR