अमरावती : अमरावती विधानसभा मतदारसंघात सध्या जिल्ह्याच्या माजी खासदार आणि भाजपाच्या स्टार प्रचारक नवनीत राणा यांच्या प्रचार वाहनाची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे नवनीत राणा यांच्या या प्रचार वाहनाद्वारे नेमका कोणाला संदेश दिला जातोय, हा चर्चेचा विषय ठरत आहे.
देवेंद्र फडणवीसांसह नवनीत राणांचा संदेश : नवनीत राणांच्या प्रचार वाहनावर लावलेल्या ध्वनिक्षेपकाद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवनीत राणा यांचा संदेश दिला जातोय. ‘नवनीत राणा यांच्या पराभवानंतर राजकमल चौकात जे काही झालं ते पाहून वेड्यांनो आता जागे झाले नाही, तर तुम्हाला रस्त्यावर फिरता येणार नाही’, असे देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य ध्वनिक्षेपकाद्वारे सातत्याने ऐकवले जातेय. यासोबतच नवनीत राणा यांनी आपल्या पराभवासंदर्भात केलेले भावनिक उद्गारदेखील ध्वनिक्षेपकाद्वारे ऐकविले जात आहेत.
माजी खासदार नवनीत राणा यांच्या माध्यमातून फिरत असणारी प्रचाराची गाडी ही सर्वाधिक विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालय, शेगाव नाका परिसर, राठी नगर गाडगे नगर, राधानगर आणि काही झोपडपट्टी परिसरात सातत्याने फिरत आहे. राठी नगर परिसरात भाजपाचे शहर अध्यक्ष प्रवीण पोटे आणि गाडगे नगर परिसरात महायुतीच्या उमेदवार सुलभा खोडके यांच्या घराच्या परिसरात हे प्रचार वाहन दिवसातून दहा वेळा फिरत असल्याचे सांगितले जात आहे.
खोडकेंविरुद्ध प्रचाराचा तर्क
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके यांचे छायाचित्र नवनीत राणा यांच्या प्रचाराच्या बॅनरवर छापले होते. संजय घोडके यांनी आक्षेप घेत हे पोस्टर काढण्यास सांगितले होते. खोडके यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत भूमिका घेतली आहे. अशातच नवनीत राणा यांची ध्वनिफीत वाजवत प्रचार वाहन अमरावती शहरात फिरत आहे. त्यावरून तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.
भाजपाने दिले स्पष्टीकरण :
नवनीत राणा यांच्या प्रचार वाहनांवर खोडके यांना पाडा, महायुतीला पाडा असा उल्लेख केला असेल तर तो निश्चितच आक्षेपार्ह असता. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांनी पराभूत केले होते. त्यामुळे नवनीत राणा यांचा प्रचार योग्य दिशेने आहे.