डेहराडून : वृत्तसंस्था
उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये सोमवारी रात्री एक भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. याशिवाय एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झालेला पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री २ वाजता डेहराडूनच्या ओएनजीसी चौकाजवळ हा अपघात झाला. सात मुलं-मुली एकत्र कारमधून निघाले होते, त्यापैकी तीन मुलं आणि तीन मुलींचा मृत्यू झाला. कारमधील सर्व मुलांचे वय २५ वर्षांपेक्षा कमी आहे.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलींमध्ये गुनीत तेज सिंह, नव्या गोयल आणि कामाक्षी यांचा समावेश आहे. या तिन्ही मुली डेहराडून शहरातील वेगवेगळ्या भागातील रहिवासी होत्या.
याशिवाय, कुणाल कुकरेजा, अतुल अग्रवाल, आणि ऋषभ जैन अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. त्यापैकी कुणाल कुकरेजा हा हिमाचलमधील चंबा येथील रहिवासी होता, तर उर्वरित डेहराडूनचे रहिवासी होते.
याशिवाय जखमी झालेल्या तरुणाचे नाव सिद्धेश अग्रवाल असे आहे. तो डेहराडूनच्या आशियाना शोरूम मधुबनसमोरील राजपूर रोड येथील रहिवासी आहे. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.