मानवत : प्रतिनिधी
येथील बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज यार्डात सोमवार, दि.११ नोव्हेंबर रोजी कापूस लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी सीसीआयने अद्रतेनुसार हमीभावाने शेतक-यांच्या कापूस खरेदीला सुरूवात केली. सीसीआयला विक्री करण्याकडे कल नसणा-या काही शेतक-यांनी खाजगी व्यापा-यांना कापूस देणे पसंत केल्याचे चित्र लिलावाच्या पहिल्याच दिवशी दिसून आले.
पहिल्याच दिवशी कापसाला सीसीआयने ७ हजार ५२१ रूपयांचा दर दिला. खाजगी व्यापा-यांनी सरासरी ७ हजार २५० रुपए दराने कापूस खरेदी केली. यावेळी पहिल्या ११ शेतक-यांचा फेटा बांधून आणि पेढे भरवून तसेच वाहन चालकांचा देखील सत्कार करण्यात आला.
मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज यार्डात कापूस लिलावाचा सोमवारी सभापती पंकज आंबेगावकर यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी उपसभापती नारायण भिसे, संचालक दत्तराव जाधव गजानन घाटूळ, ज्ञानेश्वर मोरे, गोपाळराव सुरवसे, अंबादास तूपसमुद्रे, रामेश्वर जाधव, जुगलकिशोर काबरा, बालासाहेब हिंगे, रंगनाथ वावरे, विराज मांडे सचिव शिवनारायण सारडा, संतोष लाडाने विष्णुपंत निर्वळ, भीमा कच्छवे, अमोल तारे उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी तब्ब्ल २५० वाहनांतुन कापूस घेऊन शेतकरी बाजार समितीच्या यार्डात दाखल झाले होते. लिलावात जिनींग व्यापारी सहभागी झाले होते. सोमवारी पहिल्या दिवशी कापसाला सीसीआयने ७ हजार ५२१ रुपये दराने खरेदी केली. सीसीआय कडून आद्रतेनुसार कापसाला बाजार भाव देण्यात येत आहे.
सीसीआयला कापूस विक्री करण्याकडे कल नसणा-या शेतक-यांनी खाजगी व्यापा-यांना कापूस पसंती देत असल्याचे चित्र दिसून आले. खाजगी व्यापा-यांनी सरासरी ७ हजार २५० या दराने कापूस खरेदी केला. तालुक्यातील इरळद, कोल्हा, सोमठाणा, आर्वी, पिंपळगाव गोविंदपूर गावातील बाळासाहेब आळणे, माधवराव तारे, अर्जुन भिसे, अर्जुन तारे, विक्रम निर्वळ, भागवत निर्वळ, श्रीकिशन निर्वळ, सोपान भोंग, भाऊराव घुले, काशिनाथ घुले, बालासाहेब मोरे आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.