पुणे : प्रतिनिधी
केंद्रामध्ये व नंतर राज्यातही भारतीय जनता पक्षाचीच सलग १० वर्षे सत्ता आहे, तरीही हिंदू खतरेमें कसे काय? असा प्रश्न करत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित केला आहे. पराभवाच्या भीतीने भारतीय जनता पक्ष आता हिंदू-मुस्लिम करत मतांचे धुव्रीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सचिन सावंत यांची काँग्रेसभवनमध्ये आज पत्रकार परिषद झाली.
यावेळी सावंत म्हणाले, लोकसभेचे संविधानबदलाचे वातावरण बदलले आहे असे भाजप स्वत:च सांगत आहे. मात्र इतक्या दिवसांच्या प्रचारात तसे काहीही झालेले नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच आता मतांचे धर्मयुद्ध सारख्या गोष्टी देवेंद्र फडणवीस करत आहेत. बटेंगे तो कटेंगे असे पंतप्रधान म्हणत आहेत. भाजपच्या सर्वांनीच त्यांच्या पक्षाची घटना वाचून पहावी. त्यात स्पष्टपणे धर्मनिरपेक्ष विचारसरणीवर विश्वास व महात्मा गांधी यांना आदर्श मानून असे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस घटनात्मक पदावर आहेत. ते पद स्वीकारताना त्यांनी घटनेची शपथ घेतली. त्याला विसंगत असे ते वागत आहेत.
मतांचे धर्मयुद्ध यातील धर्मयुद्ध या शब्दाला आक्षेप घेत सावंत पुढे म्हणाले, कौरव-पांडव यांच्यात झाले ते धर्मयुद्ध होते. त्यात दोन्ही पक्ष सनातनी हिंदूच होते. याचा अर्थ धर्मयुद्ध हा शब्द नीती-अनीती या अर्थाने वापरण्यात आला. फडणवीस मात्र तो हिंदू-मुस्लिम या अर्थाने वापरत आहेत. ते घटनेच्या विरोधी आहे. आम्ही याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. त्याशिवाय आता दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्ये मधूनच एखादा रस्ता दाखवत त्यावर लाडकी बहीण योजनेचा फलक दाखवतात. तीच मालिका ओटीटीवर दाखवताना त्यात मात्र फलक नसतो. आचारसंहितेपासून पळवाट काढण्यासाठी भाजप हे करत असल्याचा आरोप सावंत यांनी केला.