20.7 C
Latur
Saturday, November 16, 2024
Homeछत्रपती संभाजीनगर‘वंचित’च्या उमेदवाराला पक्ष नेत्यांनीच चाबकाने फोडले!

‘वंचित’च्या उमेदवाराला पक्ष नेत्यांनीच चाबकाने फोडले!

भाजपकडून पैसे घेतल्याचा फटका

बीड : प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. विधानसभेच्या प्रचारासाठी फक्त दोन दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार सभांना जोर आला आहे. अशातच बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला पक्षातीलच कार्यकर्त्यांकडून तोंडाला काळे फासल्याचा तसेच चाबकाने फोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भाजप पदाधिका-यांकडून पैसे घेतल्याच्या आरोपातून ‘वंचित’मध्ये हा राजकीय राडा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

केज मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सचिन चव्हाण हे प्रचार करत असताना त्यांच्या तोंडाला काळे फासत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. सचिन चव्हाण यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी केला असून शैलेश कांबळे यांच्यासह वंचितच्या स्थानिक पदाधिका-यांनी सचिन पवार यांच्या तोंडाला काळे फासले तसेच चाबकाने मारहाण केली. या घटनेची सध्या जिल्ह्यात चर्चा होत असून याबाबत अद्याप पोलिसांत नोंद झालेली नाही.

सचिन चव्हाण यांनी केज विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली. वंचितने त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर सचिन चव्हाण यांनी भाजपच्या पदाधिका-यांकडून पैसे घेतल्याचा आरोप केला जात आहे, ज्याचे व्हिडिओही समोर आले.

दरम्यान, या राड्यानंतर वंचितचे उमेदवार सचिन चव्हाण यांनी जाहीर माफीही मागितली आहे. तसेच माझ्याकडून चूक झाली यावर पक्ष जी कारवाई करेल, ती मला मान्य आहे, असंही सचिन चव्हाण म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR