इम्फाळ : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. जिरिबाम जिल्ह्यात तीन लोकांची हत्या झाली. या हत्येनंतर राज्यात पुन्हा गोंधळ उडाला असून, शनिवारी इम्फाळमध्ये आंदोलकांनी दोन मंत्री आणि तीन आमदारांच्या निवासस्थानासमोर धडक दिली आणि आमदारांच्या घरावर जमावाने हल्ला केला. त्यामुळे तणाव वाढला असून, पश्चिम इम्फाळमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली आहे.
इम्फाळ पश्चिम जिल्हा दंडाधिकारी टी किरणकुमार यांनी जारी केलेल्या आदेशानुसार शनिवारी दुपारी ४.३० वाजल्यापासून कर्फ्यू लागू करण्यात आला. लम्फेल सनकेथेल भागातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री सपम रंजन यांच्या निवासस्थानावर जमावाने हल्ला केला. लॅम्फेल सनकेथेल डेव्हलपमेंट अॅथॉरिटीचे प्रतिनिधी डेव्हिड यांनी दिलेल्या माहितीनुसार सपम यांनी आम्हाला आश्वासन दिले की, ३ लोकांच्या हत्येशी संबंधित मुद्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल आणि जर सरकार जनतेच्या भावनांचा आदर करू शकले नाही तर मंत्री राजीनामा देतील.
आंदोलकांनी ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री एल सुसिंद्रो सिंह यांच्या घरावर हल्ला केला. आंदोलकांनी सरकारने तिघांच्या हत्येसंबंधी सरकारने उत्तर द्यावे आणि २४ तासांत दोषींना अटक करावी, अशी मागणी केली.