वर्सोवा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचाच अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच, शिवसेना (उबाठा) पक्षाचे एकमेव मुस्लिम उमेदवार हारुन खान यांनी रविवार दि. १७ नोव्हेंबर रोजी मंदिरात पोहोचून प्रार्थना केली. त्यांनी शिवंिलगाला जलाभिषेक करुन देवाची आरतीही केली. यावेळी मंदिरातील पुजा-याने त्यांच्या कपाळावर टिळाही लावला. मंदिरात प्रार्थना केल्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांसह आजूबाजूच्या परिसराला भेटी देऊन लोकांशी संवादही साधला.
हारुन खान हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जातात. त्याचाच परिणाम म्हणजे, यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत हारुन खान यांना संधी दिली आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना मातोश्रीवर बोलवून वर्सोव्यातून उमेदवारी दिली. राजकीय दृष्टिकोनातून वर्सोवा ही हायप्रोफाईल जागा आहे.
३० वर्षांपासून शिवसेनेत
वर्सोव्यात सुमारे १ लाख १० हजार मतदार आहेत. या भागात हिंदूंसोबत मुस्लिमांची संख्याही मोठी आहे. त्यामुळेच एआयएमआयएम आणि भाजपची रणनीती मोडून काढत उद्धव ठाकरेंनी हारुन खान यांच्यावर पैज लावली आहे. हारुन गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेसाठी प्रामाणिकपणे काम करतात. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या काळातही ते उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले. त्याचेच फळ आता उमेदवारीच्या रुपात मिळाले आहे.